Amazons Quick Commerce : क्विक कॉमर्स कंपन्यांचा भारतात झपाट्याने प्रसार होत आहे. बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोक १० मिनिटांत घरपोच वस्तू मागवत आहेत. या कंपन्यांचे सध्याचे एकूण मूल्य ५७,७०१ कोटी रुपये आहे. ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इंस्टामार्ट या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू आहेत. पण, या स्पर्धेत आता मोठा प्लेअर उतरणार आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉन इंडियानेही या क्षेत्रात उडी घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. कंपनी आपली क्विक कॉमर्स सेवा ‘तेज’ या वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच सुरू करू शकते. Amazon India Tez लाँच करण्यासाठी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यापासून ते स्टोअर्स, स्टॉक-कीपिंग युनिट्स (SKUs) आणि जलद वितरण नेटवर्क तयार केले जात आहे.
अलीकडेच ई कॉमर्स कंपनी प्लिफकार्टने आपण “Minutes” ही सेवा लाँच केली आहे. बिगबास्केटने ऑक्टोबरमध्ये ९०० कोटी रुपयांची विक्री नोंदवली, तर टाटा डिजिटलने त्यांची “Neu Flash” सेवा देखील सुरू केली आहे. अशा परिस्थितीत आता अॅमेझॉन इंडियाही या मैदानात उतरला आहे. यापूर्वी, अॅमेझॉन इंडियाची क्विक कॉमर्स सेवा २०२५ च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार होती. परंतु, आता त्यांनी आपला विचार बदलला असून त्यापूर्वीच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील महिन्यात ठरणार लाँच तारीख
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अॅमेझॉन पुढील महिन्यात “Tez” सेवेच्या लॉन्चची तारीख निश्चित करेल. कंपनीच्या डिसेंबरच्या पुनरावलोकन बैठकीत यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. कंपनीचा वार्षिक कार्यक्रम “संभव” (९-१० डिसेंबर) डिसेंबरमध्येच आयोजित केला जाईल.
क्विक कॉमर्सची बाजारपेठ
मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसार, २०२६ पर्यंत क्विक कॉमर्स मार्केट फूड डिलिव्हरीला मागे टाकू शकते. २०३० पर्यंत ही बाजारपेठ २५-५५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. अॅमेझॉनचे मजबूत वितरण नेटवर्क आणि लॉजिस्टिक भागीदार “Tez” च्या यशात महत्वाची भूमिका बजावतील. या क्षेत्रात वेगाने पाय रोवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.