Join us

अंबानी आता होऊ शकणार नाहीत ‘बिग बाझार’चे मालक; २४ हजार कोटींचा करार संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 4:08 AM

रिलायन्स इंडस्ट्रीज, फ्यूचर ग्रुपमधील २४ हजार कोटींचा करार संपुष्टात

नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि किशोर बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुप यांच्यातील २४ हजार कोटी रुपयांचा करार संपुष्टात आला आहे. शनिवारी रिलायन्सतर्फे ही माहिती देण्यात आली. दोन्ही समूहांमध्ये अलीकडेच या करारावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता फ्यूचर ग्रुपची बिग बझार स्टोअर्स आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची होऊ शकणार नाहीत.फ्यूचर ग्रुपच्या फ्यूचर रिटेल व अन्य सूचिबद्ध कंपन्यांनी आपले समभागधारक व पतपुरवठा संस्थांनी या करारावर शिक्कामोर्तब करावे, असा प्रस्ताव ठेवला होता; पण हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. फ्यूचर ग्रुपला कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांनी या प्रस्तावाला विरोध केला. 

...असे होते कराराचे स्वरूपफ्यूचर ग्रुपने रिलायन्स इंडस्ट्रीजमधील कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (आरआरव्हीएल) आपली मालमत्ता २४,७१३ कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. त्यानुसार फ्यूचर ग्रुपच्या १९ कंपन्या रिलायन्सच्या मालकीच्या होणार होत्या.

करारावरून कायदेशीर लढाईरिलायन्स इंडस्ट्रीज व फ्यूचर ग्रुपमधील कराराविरोधात ॲमेझॉनने सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरकडे (एसआयएसी) दाद मागितली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय व नॅशनल लॉ ट्रायब्युनलकडे गेले. ॲमेझॉनने फ्यूचर कूपनबरोबर केलेला करार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) स्थगित केला, तसेच करार करतेवेळी काही माहिती लपविल्याचा ठपका ठेवत ॲमेझॉनला २०२ कोटी रुपयांचा दंडही सीसीआयने ठोठावला.

ॲमेझॉनने सुरू केला वादंग२०१९ मध्ये ॲमेझॉनचे फ्यूचर कूपनमधील ४९ टक्के समभाग १,५०० कोटी रुपयांनी खरेदी केले होते. त्यासंदर्भात झालेल्या करारानुसार ॲमेझॉनला ३ ते १० वर्षांच्या काळात फ्यूचर रिटेलमधील हिस्साही खरेदी करण्याचा अधिकार मिळणार होता. मात्र, फ्यूचर ग्रुपने आपल्या रिटेल, होलसेल, लाॅजिस्टिक कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्याचा निर्णय २०२० साली घेतला व तेव्हापासून या करारावर वादंग सुरू झाले.

टॅग्स :मुकेश अंबानी