Join us

टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून अंबानी बाहेर; अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 7:00 AM

अदानी विल्मर ही कंपनी विदेशी कंपनी विल्मर आणि अदानी समूहाचे जॉइंट व्हेंचर आहे. यात अदानी समूहाची हिस्सेदारी ४४ टक्के असेल. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत १३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

मुंबई : अदानी उद्योग समूहाची सातवी कंपनी ‘अदानीविल्मर’ शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर या समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची संपत्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा २१ हजार कोटी रुपयांनी अधिक झाली आहे.

अदानी विल्मरचा शेअर २२१ रुपयांवर सूचीबद्ध झाला. सुरुवातीला घसरल्यानंतर तो तब्बल ४१ टक्क्यांनी वाढून ३२१ वर बंद झाला आहे. अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे भांडवली मूल्य आता ११.४६ लाख कोटी रुपये झाले आहे. गौतम अदानी यांची संपत्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा २१ हजार कोटी रुपयांनी अधिक झाली आहे. अंबानी यांची संपत्ती ६.६६ लाख कोटी रुपये असून, अदानी यांची संपत्ती ६.८७ लाख कोटी रुपये आहे.

अदानी विल्मर ही कंपनी विदेशी कंपनी विल्मर आणि अदानी समूहाचे जॉइंट व्हेंचर आहे. यात अदानी समूहाची हिस्सेदारी ४४ टक्के असेल. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत १३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

 अदानी यांची संपत्ती शुक्रवारीच मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक झाली होती. त्याआधीही एक दिवस अल्पकाळासाठी अदानी यांनी अंबानी यांना मागे टाकले होते. अदानी यांची सातवी कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर मात्र आता दोघांच्या संपत्तीतील अंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

गेल्या काही वर्षांत भारतातील या दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या काळातही त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे मध्यंतरी दिसून आले होते. आता मात्र अदानी यांनी अंबानी यांना मोठ्या आर्थिक फरकाने मागे टाकल्याचे दिसून आले. 

अंबानी टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर -जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता गौतम अदानी १० व्या स्थानावर, तर मुकेश अंबानी ११ व्या स्थानावर आहेत. अदानी यांनी मोठी झेप घेतल्यानंतर मुकेश अंबानी हे जगातील टॉप-१० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. मुकेश अंबानी हे ६४ वर्षांचे, तर गौतम अदानी हे ५९ वर्षांचे आहेत. टेस्लाचे चेअरमन एलन मस्क हे २३२.२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत.

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीव्यवसाय