Join us

अमेरिका, युरोपच्या अर्थव्यवस्था आहेत कोसळण्याच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 4:53 AM

अर्थतज्ज्ञांचा इशारा; ट्रम्प यांनीही वेगळ्या संदर्भात केले सूचित

वॉशिंग्टन : अमेरिका व संपूर्ण युरोपमधील अर्थव्यवस्था ६ ते १८ महिन्यांमध्ये कोसळेल, अशी शक्यता जागतिक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशाच आशयाचे वक्तव्य वेगळ्या संदर्भात केले आहे. माझ्यावर महाभियोग चालविल्यास देशाची अर्थव्यवस्था कोसळेल आणि सारे गरीब होतील, असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्याच्या दृष्टीने अमेरिकेत तयारी सुरू झाली आहे. एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी महाभियोगाचा संदर्भ थेट अर्थव्यवस्थेशी जोडला होता.ग्रीकवरील कर्जाच्या ओझ्याने स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड, इटली या साऱ्याच देशांना अडचणीत आणले आहे. जर्मनीचीही अडचण झाली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमधील सर्व देशांचे एकच असलेले युरो हे चलन पार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपमधील देशांत सध्याच बिकट आर्थिक अवस्था निर्माण होत असल्याचे दिसत आहे. काही देशांतील नागरिकांनी व राजकीय पक्षांनी तर या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण युरोपियन युनियनमधूनच बाहेर पडावे, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.संपूर्ण युरोपात लवकरच दुसºया महायुद्धासारखी किंबहुना पहिल्या महायुद्धाच्या काळात होती तशी आर्थिक स्थिती होईल, अशी भीती अर्थतज्ज्ञांना वाटते. त्या काळात जगभर मंदीची लाट होती. सर्व शेअर बाजार कोसळले होते, चलनाचे मूल्य कोसळले होते. जर्मनीतील तज्ज्ञांनी आताच तसा इशारा दिला आहे. इटलीच्या पंतप्रधानांनी तर युरो सध्या आणीबाणीमध्ये अडकले आहे, असे स्पष्ट विधान केले आहे. जगभर उमटतील पडसादअसे झाल्यास परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होईल आणि अमेरिकेच्या डॉलर या चलनाचीही घसरण सुरू होईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, बँका कोलमडतील आणि सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होईल. अन्नधान्यांची दुकाने रिकामी वा ओस पडतील, तिथे काहीच मिळणार नाही आणि प्रसंगी जगाच्या अनेक भागांत हिंसाचार वाढू शकेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :अमेरिकापोर्तुगालआयर्लंडइटलीअर्थव्यवस्था