वॉशिंग्टन: अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहे. यातच आता अमेरिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे रुपया आणखी तळ गाठू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे भारत सरकारची चिंता वाढण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या फेडरल बँकेने तब्बल २८ वर्षांनंतर व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसू शकतो, असे म्हटले जाते आहे.
अमेरिकेतील व्याज दरातील वाढीमुळे भारतीय बाजारपेठेवर संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्हने व्याज दरात ०.७५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या २८ वर्षांतील ही सर्वांत मोठी वाढ आहे. अमेरिकेत महागाईचा दर ४० वर्षातील उच्चांकी स्तरावर आहे. मे महिन्यात महागाईचा दर ८.६ टक्के इतका नोंदवला गेला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने हा निर्णय घेण्यात आला. व्याज दरातील ०.७५ टक्के ही १९९४ नंतरची सर्वाधिक आहे.
अमेरिकेने व्याज दरात वाढ केल्याचा परिणाम भारतावर होणार
अमेरिकेने व्याज दरात वाढ केल्याने त्याचा परिणाम भारतावर देखील होणार आहे. अमेरिकेपाठोपाठ जगातील अन्य देशातील बँकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. फेडरल रिझव्हच्या बैठकीच्या आधीच जागतिक शेअर बाजारावर त्याचे परिणाम दिसत होते. बैठकीच्या आधी व्याजदरात वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेत व्याज दर कमी होतात तेव्हा FPI गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा येतो. यामुळे शेअर बाजारात तेजी राहते.
व्याज दरवाढीमुळे डॉलर आणखी मजबूत होईल
व्याज दरवाढीमुळे डॉलर आणखी मजबूत होईल आणि त्याचा परिणाम रुपयावर होईल, असे सांगितले जात आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सर्वांत निचांकी स्तरावर आहे. बुधवारी रुपायामध्ये १८ पैशांची मोठी घसरण होत तो सर्वांत निचांकी ७८.२२ प्रती डॉलरवर बंद झाला होता.