ही १९६७ मधली गोष्ट आहे. दमयंती हिंगोरानी गुप्ता या धाडसी भारतीय महिला इंजिनिअरनं अमेरिकेतील फोर्ड मोटर्स कंपनीच्या धोरणांना आव्हान दिलं. कंपनी महिला इंजिनिअर्सना कामावर घेत नव्हती. पण, दमयंती यांनी हार मानली नाही आणि नोकरीसाठी प्रयत्न सुरुच ठेवले. एचआर विभागानं त्यांचा अर्ज फेटाळला. "जर तुम्ही आम्हाला संधीच दिली नाही तर, महिला इंजिनिअर्स कशा मिळतील?" असा सवाल त्यांनी त्यावेळी केला. त्यांचा आत्मविश्वास पाहून रिक्रूटर प्रभावित झाले आणि त्यांनी कंपनीची धोरणं बदलून त्यांना नोकरी दिली.
फोर्ड मोटर्स ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी आहे. याची स्थापना १९०३ मध्ये हेन्री फोर्ड यांनी केली. फोर्डनं ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणली. असेंब्ली लाईनचा शोध लावून त्यांनी कार्सच्या मोठ्या प्रमाणात निर्मितीची पद्धतच बदलली होती.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या पहिल्या महिला
दमयंती यांचा जन्म १९४२ मध्ये झाला. वयाच्या तेराव्या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरूं यांच्या विचारांनी त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा दिली."स्वातंत्र्यानंतर भारताला इंजिनिअर्सची गरज आहे. फक्त मुलंच नाही तर मुलींचीही गरज आहे," असं ते म्हणाले होते. आपल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या दमयंती या पहिल्या महिला ठरल्या.
हेन्री फोर्ड यांचं चरित्र वाचून फोर्ड मोटर्समध्ये काम करण्याचं स्वप्न त्यांनी जोपासलं. फोर्ड मोटरची पायाभरणी हेन्री फोर्ड यांनी केली. प्रत्येक अमेरिकन कुटुंबाकडे कार असावी, असं हेन्री फोर्ड यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी मॉडेल टी नावाची परवडणारी कारही तयार केली होती.
भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा
दमयंती यांची कथा धाडस आणि चिकाटीचं उदाहरण आहे. त्यांनी आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीच्या जोरावर भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा केला आणि भेदभावपूर्ण धोरणं बदलली. जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही, हे दमयंती यांनी सिद्ध केलं.