Join us

नवीन आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? टॉमेटोमुळे घ्यावी लागणार माघार? काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:36 IST

Trump Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच कॅनडा, चीन आणि मेस्किको या देशांवर नवीन आयात शुल्क लादले आहे. याचा परिणाम आता सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांनाही बसणार आहे.

Trump Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर इतर देशांवर आयात शुल्क लादण्यास सुरुवात केली आहे. कॅनडा, चीन आणि मेक्सिको या देशांवरील आयात शुल्कात ट्रम्प यांनी मोठी वाढ केली आहे. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट येणार अशी चिन्हे आहेत. ट्रम्प इतर देशांबरोबरच अमेरिकन नागरिकांचाही त्रास वाढवतील, असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे. कारण, आयात शुल्क वाढवल्यानंतर जीवनावश्यक गोष्टींच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क (नवीन टॅरिफ) वाढवल्याने सामान्य अमेरिकन ग्राहकांना या सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण, त्यांच्या आवडत्या उत्पादनांसाठी जसे की टोमॅटो, ॲव्होकॅडो आणि टकीला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या आयात मालावर नवे शुल्क लादले आहे. आधीच अमेरिकन नागरिकमहागाईने हैराण झाले आहेत. अशात या निर्णयानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टोमॅटो आणि टकीला महागणारफायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार अमेरिकेचे ३ मोठे व्यापारी भागीदार आहेत. चीन, मेक्सिको आणि कॅनडा. अमेरिकेच्या एकूण व्यापारापैकी ४० टक्के व्यापार या देशांसोबत होतो. अमेरिकेत टकीलाला मोठी मागणी आहे. मेक्सिको आणि कॅनडा हे टोमॅटो आणि ॲव्होकॅडोसह अनेक कृषी उत्पादनांचे सर्वात मोठे पुरवठादार आहेत. २०१९ ते २०२१ या कालावधीत यूएसला होणाऱ्या ॲव्होकॅडोच्या जवळपास ९० टक्के माल मेक्सिकोमधून आयात केला जातो. अशा स्थितीत ट्रम्प यांनी या देशांतून येणाऱ्या वस्तूंवरील शुल्कात वाढ केल्याने सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या खिशावर थेट बोजा पडणार आहे.

या वस्तूंच्या किमतीही वाढू शकतातअमेरिका दरवर्षी चीनकडून अब्जावधी डॉलर्सची उपकरणे आणि यंत्रसामग्री आयात करते. यामध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. नवीन टॅरिफला प्रतिक्रिया म्हणून चीनही कठोर पावले उचलू शकतो, ज्यामुळे अमेरिकन ग्राहकांवर आणखी दबाव येऊ शकतो. त्याच वेळी, मेक्सिको आणि कॅनडाची सरकारे देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

कॅनडाने अमेरिकेतून आयात केलेल्या १,२५६ उत्पादनांची यादी जारी केली आहे, ज्यावर ते शुल्क लावणार आहेत. यामध्ये पोल्ट्री, दुग्धजन्य पदार्थ, ताजी फळे आणि भाज्या, लाकूड, कागदी उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. याचा अर्थ ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा फटका इतर देशांनाच बसणार नाही, तर सर्वसामान्य अमेरिकनही अडचणीत येणार हे स्पष्ट आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाचीनकॅनडामेक्सिको