United States National Debt Crsis : जागतिक महासत्ता असलेली अमेरीका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. 'नाव मोठ्ठं लक्षण खोटं', असा वाक्प्रचार आपल्याकडे प्रसिद्ध आहे. सध्या हा अमेरीकेतील नागरीकांना चपलख बसत आहे. कारण, अमेरिकासारखा शक्तीशाली देश सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जानेवारी २०२५ मध्ये ते दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. पण ट्रम्प सिंहासनावर बसण्यापूर्वी त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे ते अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज जे ३६ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. अवघ्या ४ महिन्यांत अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकावर एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे.
प्रत्येक अमेरिकन नागरिकावर १ लाख डॉलरचे कर्ज
गेल्या आठवड्यात, ट्रेझरी विभागाने अमेरिकेच्या थकित कर्जाची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज ३६ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. तर जून २०२४ मध्ये अमेरिकेवर ३५ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. म्हणजे अवघ्या ४ महिन्यांत कर्जाचा बोजा एक ट्रिलियन डॉलरने वाढला. अमेरिकेचे कर्ज दरवर्षी ३ ट्रिलियनने वाढत आहे. अमेरिकेवर असलेल्या कर्जाच्या या आकडेवारीनुसार, प्रत्येक अमेरिकन नागरिकावर एक लाख डॉलर (८४ लाख रुपये) कर्जाचा बोजा आहे.
वर्षाला एक ट्रिलियन डॉलर्सचे व्याज
अमेरिका कर्जाच्या जाळ्यात अडकल्यामुळे दरवर्षी तिथल्या सरकारला व्याजापोटी १ ट्रिलियन डॉलर्स द्यावे लागत आहे. ही रक्कम संरक्षण, पायाभूत सुविधा, शिक्षण, गरिबी निर्मूलन कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा आणि मेडिकेअरवर सरकार खर्च करत असलेल्या आडक्यापेक्षा जास्त आहे.
कर्जाचा बोजा का वाढला?
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला असे नाही. जेव्हा बिडेन सरकार सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर २६.९ ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. त्यांच्या कार्यकाळात कर्जाचा बोजा ९ ट्रिलियन डॉलरने वाढला आहे. ट्रम्प जेव्हा शेवटचे सत्तेवर होते, तेव्हा अमेरिकेवर १९ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. त्यांनी मागील कार्यकाळात कर्ज कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ते पूर्ण करू शकले नाहीत. यापूर्वीच्या अनेक सरकारांनी फालतू खर्च केल्यामुळे अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे.
अमेरिकन नागरिकांवर कराचा बोजा वाढणार
अमेरिकेची वित्तीय तूट अनेक ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. अमेरिकेवर सध्याचा कर्जाचा बोजा यापूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या वर्षी दिसला होता. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे अमेरिकन सरकारला आपल्या अर्थसंकल्पात व्याजाच्या पेमेंटसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर सरकारला आपल्या नागरिकांवर अधिक कर लादावे लागतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर देशांतील नागरिकांना हद्दपार करण्याची जी घोषणा केली होती, ती अंमलात आणल्यास अमेरिकेचे कर्ज संकट अधिक गडद होऊ शकते. कारण हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील. कर्जाच्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन सरकारला बजेटमध्ये ८ ट्रिलियन डॉलर्सच्या खर्चात कपात करावी लागेल, तरच अमेरिका कर्जाच्या संकटातून बाहेर पडू शकेल.