25% Tariff On Imported Cars: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (America President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा मोठा टॅरिफ बॉम्ब (Tariff Bomb) फोडला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी, आता अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व परदेशी गाड्यांवर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल असं म्हटलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही हा तात्पुरता निर्णय नसून कायमस्वरूपी असल्याचं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक बड्या भारतीय कंपन्यांनाही बसू शकतो. यात टाटा मोटर्सपासून महिंद्रा आणि आयशर मोटर्सपर्यंतचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी वाहन आयातीवर २५ टक्के उच्च शुल्काची घोषणा केली. तसंच अमेरिका देशात तयार होत नसलेल्या सर्व कारवर प्रभावीपणे हे शुल्क लागू करेल. मात्र, जर तुम्ही तुमची कार अमेरिकेत बनवत असाल तर त्यावर कोणतेही शुल्क लागू होणार नाही, असं ट्रम्प म्हणाले. २ एप्रिलपासून नवे दर लागू होणार असून त्याची वसुलीही दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे अमेरिकन ग्राहकांसाठी महागाई वाढू शकते. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर होऊ शकतो.
अनेक प्रकारच्या वाहनांची निर्यात
विशेष म्हणजे भारतातून अमेरिकेत अनेक प्रकारची वाहनं निर्यात केली जातात. भारतातून अमेरिकेत ऑटोमोबाईल, ट्रक आणि मोटारसायकल निर्यात केली जाते. यात टाटा मोटर्सपासून आयशर मोटर्सपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये भारतानं अमेरिकेला ३७.१४ मिलियन डॉलर्सची मोटार वाहनं निर्यात केली. भारत आतापर्यंत परदेशातून येणाऱ्या वाहनांवर १०० टक्क्यांहून अधिक शुल्क आकारत आला आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा याचा उल्लेख केला आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या बहुतांश कार सेडान आणि हॅचबॅक आहेत.
टाटा मोटर्सचा मोठा व्यवसाय
टाटा मोटर्स ही जागतिक ऑटोमोबाईल कंपनी असून अमेरिकेत तिचा मोठा व्यवसाय आहे. जग्वार लँड रोव्हरच्या (जेएलआर) माध्यमातून तो तेथे आहे. टाटा मोटर्सनं २००८ मध्ये फोर्डकडून जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) विकत घेतले, जे आता टाटा मोटर्सचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि अमेरिकेतही कार्यरत आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्राचा अमेरिकेत व्यवसाय आहे. त्याचबरोबर आयशर मोटर्सला जड वाहनांसह कंपनीच्या रॉयल एनफिल्ड या मोटरसायकलला मोठी मागणी आहे.
टाटा मोटर्सचे शेअर्स आपटले
ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केलेल्या गाड्यांवर लादलेल्या २५ टक्के शुल्काचा सर्वात मोठा परिणाम गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान भारतीय वाहन कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्सवर दिसून आला आणि तो उघडताच तो कोसळला. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ६.५० टक्क्यांनी घसरून ६६१.१० रुपयांवर आला होता. याशिवाय ऑटो सेक्टरमधील महिंद्रा अँड महिंद्राचा शेअरही घसरणीसह रेड झोनमध्ये उघडला आणि २७२८.३० रुपयांवर ट्रेड करताना दिसला. याशिवाय आयशर मोटर्सचा शेअरही रेड झोनमध्ये उघडला आणि सुरुवातीला १.५० टक्क्यांहून अधिक घसरून ५३०० रुपयांवर आला.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)