नवी दिल्ली : भारताकडून होणारी मोबाइल फोन निर्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत १.७५ लाख कोटी रुपयांच्या (२१ अब्ज डॉलर) विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. हे वर्ष संपण्यासाठी आणखी एक महिना बाकी आहे.
इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांच्या तुलनेत ५४% जास्त आहे. यात ॲपल कंपनीचे योगदान सर्वाधिक आहे. सध्या अमेरिका व युरोपमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनची निर्यात होते. एकूण स्मार्टफोन निर्यातीपैकी ५० ते ५५ टक्के हिस्सा अमेरिकेकडे जातो. यात ॲपल कंपनीचा वाटा मोठा आहे.
२१ अब्ज डॉलरचा विक्रम
पहिल्या तिमाहीत स्मार्टफोनची निर्यात ४.८५ अब्ज डॉलरवर होती. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक आहे.
सहा महिन्यांच्या अखेरीस निर्यात ८.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढली. ६.५ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात झाली.
तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनची दर महिन्याला २ अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात झाल्याने तिमाहीतील निर्यात ६.८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. चौथ्या तिमाहीतील दोन महिन्यांत ५.६ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात झाली. त्यामुळे निर्यात २१ अब्ज डॉलरवर गेली.
हिऱ्यांना टाकले मागे
यावर्षी अमेरिकेकडे निर्यात होणाऱ्या फोनमध्ये मोठा वाटा आयफोनचा आहे. या निर्यातीने बिगर औद्योगिक हिऱ्यांच्या निर्यातीला मागे टाकले आहे.
आयफोनचा वाटा ७०%
ॲपलची निर्यात १.२५ लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. एकूण निर्यातीत आयफोनचे योगदान ७०% इतके आहे.
ॲपलचे पुरवठादार फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स व पेगाट्रॉन यांचा एकूण निर्यातीत वाटा ७० टक्के आहे. उर्वरित निर्यातीमध्ये सॅमसंग आणि इतर भारतीय ब्रँड्सचा समावेश आहे.
‘पीएलआय’ देण्याचा विचार
स्मार्टफोन उत्पादनातील यशामुळे उत्साहित झालेल्या सरकारने उद्योगाला मजबूत करण्यासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) लाभ देण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे मूल्यवर्धन करणे शक्य होईल.