प्रसाद गो. जोशी, या सप्ताहामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांची काय घोषणा होते, याकडे जगाचे डोळे लागले आहेत. यामधून भारतीय शेअर बाजाराला काय मिळते यावर बाजाराचा मूड अवलंबून राहणार आहे. भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल व पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती यावरही बाजाराचे लक्ष असेल.
गत सप्ताहामध्ये अर्थसंकल्पानंतर झालेली घसरण भरून निघाली आहे. या सप्ताहामध्ये अमेरिकेतील बेरोजगारीचा दर, चीनचा जीडीपी, बँक ऑफ इंग्लंडची बैठक या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बाबी आहेत. याशिवाय भारतामधील पीएमआय, वाहनविक्रीची आकडेवारीही जाहीर होणार आहे.
परकीय वित्तसंस्थांकडून होतेय विक्री
शेअर बाजाराबद्दल केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या काही तरतुदींनंतर परकीय वित्तसंस्थांनी गत सप्ताहात बाजारातून ७२०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. याशिवाय या संस्थांनी रोख्यांमध्ये १९,२२३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जुलै महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारात ३३,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांचा गुंतवणूक कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. या संस्थांनी गत सप्ताहामध्ये ८११० कोटी रुपये गुंतविले आहेत.
१० लाख कोटींनी वाढले बाजार भांडवल
अर्थसंकल्पानंतर बाजारात संचारलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री तरी नफा झालेला दिसून आला. गत सप्ताहामध्ये बाजार भांडवलमूल्यामध्ये १० लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलमूल्य ४,५६,९२ ६७१.३३ कोटी रुपयांवर पोहोचलेले आहे. त्यामुळे सध्या बाजारामध्ये सर्वत्र खुशीचे वातावरण आहे.