American Airlines Refund Case : ऑनलाईन पेमेंट करताना चुकून जास्त पैसे दिल्याचा अनुभव तुम्हालाही कधीतरी आला असेल. अशावेळी आपल्या लक्षात आलं तर आपण ते समोरच्याला सांगून पैसे परत मिळवतो. मात्र, जर तुम्हाला कोणी काही हजारांच्या बदल्यात लाखो रुपये दिले तर काय कराल? अशीच एक घटना समोर आली आहे. झालं असं की एका अमेरिकन एअरलाइन्सला त्यांच्या प्रवाशाला तिकिटाचे १००० डॉलर रिफंड करायचे होते. मात्र, चुकून एक शून्य जास्त टाकल्याने १ लाख डॉलर ग्राहकाच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. मात्र, हे पैसे परत करण्यासाठी प्रवाशालाच जास्त त्रास झाला.
नेमकं काय घडलं?
आपल्या खात्यात जास्त पैसे आल्याचे लक्षात येताच प्रामाणिक ग्राहकाने अमेरिकन एअरलाइन्सच्या कस्टमर केअरला फोन करून चूक समजावून सांगितली. मात्र, आम्ही योग्य रिफंड केला असल्याचे त्याच्या एजंटने सांगितले. ग्राहकाने ईमेल लिहून सोशल मीडियावर तक्रारही केली, पण मदत मिळाली नाही. जर एअरलाइन्सला नंतर चूक समजली तर ते आणखी पैशांची मागणी करू शकतात, अशी भीती ग्राहकाला होती. एक ना एक दिवस हे प्रकरण उजेडात येईलच याची खात्री ग्राहकाला असल्याने तो वारंवार कंपनीशी संपर्क करत होता.
प्रवाशाची अमेरिकन एक्सप्रेसला साद
कंपनी दाद देत नसल्याने शेवटी ग्राहकाने अमेरिकन एक्सप्रेसमध्ये वाद दाखल केला. २७ फेब्रुवारी रोजी एअरलाइन्सने चूक मान्य केली. परंतु, तरीही ती सुधारली नाही. याउलट, त्यांनी ग्राहकांकडून २.८ कोटी डॉलर वसूल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्राहकाला धक्का बसला. १ मार्च रोजी अमेरिकन एक्सप्रेसने ग्राहकाचे कार्ड बंद केले. कारण उच्च कर्ज एक्सपोजर होते. ग्राहकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयीन वेळेबाहेर कोणताही वरिष्ठ अधिकारी सापडला नाही. कनिष्ट कर्मचारी ३ कोटी डॉलरची चूक दुरुस्त करू शकले नाहीत.
३ मार्च रोजी अमेरिकन एक्सप्रेसने चूक मान्य केली. दुसऱ्या दिवशी २.८ कोटी डॉलरची वसुली रद्द केली. पण, या प्रक्रियेत, ३ लाख डॉलरचा रिफंड आणि ७५,००० डॉलर किमतीचे चलनाचे नुकसान झाले. अमेरिकन एअरलाइन्स आणि अमेरिकन एक्सप्रेसने ग्राहकाची माफी मागितली. ग्राहकाला काही नुकसानभरपाई देखील देण्यात आली.