नवी दिल्ली : अमेरिकेतून भारताला होणारी सफरचंदांची निर्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट वाढली आहे. २०१९ मध्ये अमेरिकी उत्पादनांवर लावलेले २० टक्के शुल्क हटविले आहे. त्यामुळे सफरचंदांच्या निर्यातीला फायदा झाला. वाॅशिंग्टनच्या सफरचंद उत्पादकांनी यंदा १० लाख पेट्या सफरचंद भारतात पाठवले. मागच्या वर्षाच्या तुलनेत ते १६ पट अधिक आहे. या यशाबद्दल मंगळवारी सिएटल बंदरावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अमेरिकी खासदार मारिया केंटवेल यांनी सिएटलमध्ये पत्रकारांना सांगितले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांचा हा नवा उच्चांक आहे.
सिएटलमधील भारताचे महावाणिज्य दूत प्रकाश गुप्ता यांची या सोहळ्यास उपस्थिती होती. २० टक्के शुल्क लावल्यानंतर वॉशिंग्टनमधील सफरचंदांची भारताला होणारी निर्यात घसरली होती. शुल्क लावण्याच्या आधी वॉशिंग्टनच्या सफरचंद उत्पादकांनी भारतास १२ कोटी डॉलरची सफरचंदे निर्यात केली होती. शुल्क लावल्यानंतर निर्यात १० लाख डॉलरवर घसरली होती.
१.९५ कोटी डॉलर्सच्या पेट्या पाठविल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यादरम्यान हे शुल्क हटविण्यात आले. त्यानंतर या पीक हंगामात दोन्ही देशांतील व्यापार सामान्य झाला.
वाॅशिंग्टनच्या आयोगानुसार, वाॅशिंग्टनच्या उत्पादकांनी चालू हंगामात १,१९०,०००४० पौंड सफरचंद पेट्या भारतात पाठवल्या.
त्यांची किंमत सुमारे १.९५ कोटी डॉलर इतकी आहे.