Join us

अमेय प्रभू 'आयसीसी'च्या अध्यक्षपदी! १९२५ नंतर पहिल्यांदाच मराठी व्यक्तीकडे पद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 12:05 PM

कोलकाता येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारली सूत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: व्यावसायिक, लेखक व समाजसेवी तसेच ‘एनएएफए कॅपिटल ॲडव्हायजर्स’चे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक अमेय सुरेश प्रभू यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. माजी केंद्रीय मंत्री सुुरेश प्रभू यांचे ते पुत्र आहेत.

कोलकाता येथील ‘ताज बेंगॉल हॉटेल’मध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यूएपी ॲडव्हायजर्स एलएलपीचे भागीदार असलेले प्रभू हे प. बंगाल बाहेरील पहिले आयसीसी अध्यक्ष ठरले आहेत. कोलकत्यात मुख्यालय असलेली आयसीसी ही भारतातील सर्वाधिक जुनी ‘चेंबर ऑफ कामर्स’ संस्था आहे. १९२५ पासून ती देशाच्या व्यावसायिक क्षेत्रास आकार देण्यात सक्रीय भूमिका निभावत आहे.

याच कार्यक्रमात जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभ्युदय जिंदाल यांनी आयसीसीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच, श्याम मेटॅलिक्सचे व्हॉइस चेअरमन तथा एमडी ब्रिजभूषण अगरवाल यांनी आयसीसीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी प्रभू यांनी सांगितले की, हा नवा अध्याय माझ्यासाठी नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या घेऊन आला असून मी खुल्या बाहूंनी त्याचा स्वीकार करतो. येणाऱ्या वर्षांत आयसीसी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी भरारी घेऊन खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची संस्था बनेल, याची मला खात्री आहे.

१९२५ नंतर पहिल्यांदाच मराठी व्यक्तीकडे पद

  • अमेय सुरेश प्रभू यांनी ब्रिटनमधील वर्विक विद्यापीठातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास या विषयांत बीएस्सी पदवी प्राप्त केली आहे. 
  • तसेच, माद्रिद येथील आयई बिझनेस स्कूलमधून त्यांनी वित्तीय व्यवस्थापनात एमएस्सी केले आहे. १९२५ सालानंतर आयसीसी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविणारे अमेय प्रभू हे  पहिलेच महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. 
टॅग्स :व्यवसायसुरेश प्रभूमराठी