केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सहारा रिफंड पोर्टल लाँच केलं. या पोर्टलद्वारे सहारा मध्ये अडकलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. सहारा इंडियामध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सहाराच्या सहकारी संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून ज्यांचे पैसे पडून आहेत त्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले.
या पोर्टलच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी कोट्यवधी लोकांना याचा फायदा होणार असल्याचं म्हटलं. सहारा रिफंड पोर्टलद्वारे ५ हजार कोटी रुपये पारदर्शक पद्धतीनं गुंतवणूकदारांना परत केले जातील. अनेक वर्षे न्यायालयात खटला चालला, मल्टी एजन्सी जप्ती झाली. अशा परिस्थितीत मोदी सरकारनं गुंतवणूकदारांच्या हितासाठी रिफंड पोर्टलच्या माध्यमातून पुढाकार घेतला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
गुंतवणूक केलेल्यांना त्यांचे पैसे परत करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही एक उत्तम सुरुवात आहे, पारदर्शकतेमुळे कोट्यवधी लोकांना त्यांचे कष्टाचे पैसे परत मिळण्याची सुरूवात झाल्याचे अमित शाह म्हणाले. चार सहकारी संस्थांचा सर्व डेटा ऑनलाइन आहे. हे पोर्टल १.७ कोटी ठेवीदारांना नोंदणी करण्यास मदत करेल. या ठेवीदारांचे दावे निकाली काढले जातील. ४५ दिवसांच्या आत ठेवीदारांच्या बँक खात्यात पैसे परत केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
किती दिवसांत पैसे मिळणार?या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक मॅच्युअर झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल. या पोर्टलवर गुंतवणूकदार आपली नावं नोंदवतील. पडताळणीनंतर त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची सहारा समूहाच्या समित्या ३० दिवसांत पडताळणी करतील.
एसएमएसद्वारे माहितीत्यानंतर, ऑनलाइन दावा दाखल केल्यानंतर १५ दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना एसएमएसद्वारे कळवलं जाईल. यानंतर गुंतवणुकीची रक्कम बँक खात्यात येईल. म्हणजेच या प्रक्रियेला किमान ४५ दिवस लागतील.
रिफंड पोर्टल सुरू झाल्यामुळे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या १० कोटी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहारामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पैसे कोणत्या सहकारी संस्थेत गुंतवले आहेत हे तपासावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्याशी संबंधित सर्व कागदपत्रं गोळा करावी लागतील.
कशी आहे प्रक्रिया?नोंदणीसाठी, अर्जदारांना आधार कार्डचे अखेरचे ४ क्रमांक एन्टर करावे लागतील. यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आलेला OTP टाकावा लागेल. या प्रक्रियेनंतर, 'अटी आणि शर्ती' यावर टीक करावी लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १२ अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा टाकावा लागेल. तुम्ही ओटीपी टाकताच तुमचा संपूर्ण तपशील आधार कार्डद्वारे पडताळला जाईल. यानंतर पुढील प्रक्रियेत वडिलांचे/पतीचे नाव आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. यानंतर सोसायटीशी संबंधित एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर पीडीएफ फॉर्म डाउनलोड होईल. पीडीएफ फॉर्मची प्रिन्टआऊट घेतल्यानंतर त्यावर तुमचा फोटो चिकटवा आणि सही करा. प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला तोच फॉर्म 'CRCS सहारा रिफंड पोर्टल' वर अपलोड करावा लागेल. यासोबतच तुम्हाला पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर, नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी नोंदणी क्रमांक तुमच्याकडे ठेवा. यासाठी तुम्हाला https://mocrefund.crcs.gov.in/Depositor/Register या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.