लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल कोरोना काळातही सुरूच असून, पुढील वर्षी ती जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था बनेल आणि आगामी काळात आपला देश औद्योगिक उत्पादनाचे जगभरातील सर्वांत मोठे केंद्र असेल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वतीने येथे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून अमित शहा बोलत होते. माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल पी. सदाशिवम विशेष अतिथी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, आयसीएसआयचे अध्यक्ष नागेंद्र राव, माजी अध्यक्ष रणजित पांडे, उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, सचिव आशिष मोहन व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि भारताला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी दीर्घ चर्चा करीत मोदी यांनी पायाभूत सुविधा, गुंतवणूक क्षेत्रात अनेक बदल केले, सवलतींचे पॅकेज दिले, या क्षेत्रात पारदर्शकतेसाठी कायद्यांमध्ये बदल केले. त्या आधारे विविध क्षेत्रांमध्ये भारत क्रमांक एकचा देश करण्यासाठीची योग्य वेळ आता आली आहे. देशाचा विकास दर लवकरच दोन आकडी संख्या गाठेल, असेही ते म्हणाले.
देशाच्या विकासात कंपनी सेक्रेटरींची मोठी भूमिका असल्याचे सांगून, कंपन्यांच्या व्यवस्थापनांना चुकीच्या बाबींपासून दूर ठेवण्याची, सरकारी नियमांची त्यांना जाणीव करून देण्याची आणि त्याच वेळी भागधारकांचे हित जोपासण्याचीही सजग प्रहरी म्हणून त्यांची जबाबदारी आहे, असे शहा म्हणाले.
पद्मभूषण दीपक पारेख यांनी कंपनी सेक्रेटरींच्या भूमिकेची प्रशंसा करतानाच कॉर्पोरेट क्षेत्र अनैतिक बाबींपासून दूर राहावे यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. मी गेल्या ५० वर्षांमध्ये नव्हतो इतका आज देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वांत मोठी व वेगवान बनेल, याबाबत आशादायी असल्याचे ते म्हणाले.
देशामध्ये गतिमान औद्योगिक वातावरण तयार करण्यासाठी कंपनी सेक्रेटरींची भूमिका आहेच; पण कॉर्पोरेट कायदे, त्या अनुषंगाने येणारी पारदर्शकता या संदर्भातही त्यांच्या भूमिकेचे महत्त्व आहे, असे न्या. सदाशिवन म्हणाले.
‘गुड गव्हर्नन्स’वरील चर्चासत्रात मान्यवर
‘गुड गव्हर्नन्स - अ बिझनेस मँडेट’ या विषयावरील चर्चासत्राचे मुख्य वक्ते दीपक पारेख होते. हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष अशोक सुता, महेंद्रा अँड यंग नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के. चौहान, रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त डेप्युटी गव्हर्नर श्यामला गोपीनाथ हे प्रमुख वक्ते होते.
सहकार चळवळ जोडण्यासाठी मंत्री झालो
लोणी (अहमदनगर) : सहकार चळवळ मोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी मी सहकारमंत्री झालो आहे. विरोधकांनी या चळवळीकडे राजकारण म्हणून पाहू नये. सहकार चळवळीसाठी आजवर समित्याच खूप झाल्या. आता थेट निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथे केले.