नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून वाढत असलेले जीवनावश्यक वस्तूंचे दर अजूनही महागत आहेत. आता दूध उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या अमूलने दुधाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. अमूलने दूधाच्या दरामध्ये दोन रुपये प्रति लीटर एवढी वाढ केली आहे. नवे दर हे १७ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून लागू होणार आहेत.
अमूल कंपनीने या दरवाढीबाबत माहिती देताना सांगितले की, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगालमध्ये नवे दर लागू होणार आहेत. कंपनीने सांगितले की, दरवाढीनंतर ५०० मिली अमूल गोल्ड दुधाची किंमत आता ३१ रुपये असेल. तर अमूल ताजा ५०० मिली दुधाची नवी किंमत २५ रुपये असेल. तर अमूल शक्ती ५०० मिली दुधाची नवी किंमत ही २८ रुपये असेल.
कंपनीने भाववाढीबाबत सांगितले की, वाहतुकीचा खर्च आणि दुधाच्या उत्पादनाचा वाढलेला खर्च यामुळे दरवाढवण्यात येत आहेत. दरम्यान, अमूल कंपनीने यापूर्वी १ मार्च २०२२ रोजी दुधाचे दर वाढवले होते. त्यावेळी दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा हवाला देत वाहतूक खर्च वाढल्याचे कारण देत ही वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, सरकारने गेल्या महिन्यापासून दुधाच्या उत्पादनांवर ५ टक्के जीएसटी लावला होता. त्यामुळे दही आणि लस्सीच्या किमतींमध्ये आधीच वाढ झाली होती. आता दुधाची किंमतही वाढल्याने सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट बिघडणार आहे.