Join us  

दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:05 PM

अरविंद कृष्णा हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वीही ऐकलं असेल. त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे १६५ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे ते दररोज सुमारे ४५ लाख रुपयांची कमाई करतात. पाहू कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास.

अरविंद कृष्णा हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वीही ऐकलं असेल. ते आयबीएमचे सीईओ आहेत. जगातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे १६५ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे ते दररोज सुमारे ४५ लाख रुपयांची कमाई करतात. २०२३ मध्ये त्यांच्या पगारात तब्बल ३० कोटी रुपयांची वाढ झाली होती. कृष्णा हे १९९० पासून आयबीएमशी जोडलेले आहेत. ३ दशकांहून अधिक काळ त्यांनी कंपनीत सेवा बजावली आहे. २०२० मध्ये सीईओ झाल्यापासून त्यांनी कंपनीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीये.

अरविंद कृष्णा यांची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. १९९० मध्ये आयबीएममध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी कंपनीत विविध पदांवर काम केलं. हळूहळू ते प्रगतीच्या पायऱ्या चढत गेले. सीईओ होण्यापूर्वी ते कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आयबीएमनं रेड हॅट ३४ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतली, ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली. इतकंच नाही तर कृष्णा यांच्या नावावर १५ पेटंटही आहेत, जे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा पुरावादेखील आहेत.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी.

अरविंद कृष्णा हे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. कृष्णा यांचं शालेय शिक्षण तामिळनाडू आणि डेहराडून येथे झालं. यानंतर त्यांनी कानपूरच्या प्रतिष्ठित आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. येथेच त्यांना आयबीएममध्ये नोकरी मिळाली ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं.

कंपनीच्या प्रगतीत मोठी भूमिका

आयबीएममधील यशामागे कृष्णा यांच्या अभ्यासाचा मोठा हात आहे. कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली आयबीएम ही जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचं बाजारमूल्य १,४५०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कंपनीला पुढे नेण्यात कृष्णा यांनी किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे या वेतनवाढीवरून दिसून येतच आहे. आयबीएम ही जगातील सर्वात जुनी आणि मोठी आयटी कंपनी आहे.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी