Job Cut Wave २०२४ : भारतात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. महाराष्ट्रात तर गणेश उत्सवामुळे आनंद शिगेला पोहचला आहे. अशा आनंदाच्या वातावरणात जॉब मार्केटमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात जगातील तीन नामांकित कंपन्यांनी हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दिग्गज टेक कंपनीचाही समावेश आहे. याचा फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे. मात्र, या मोठ्या कंपन्यांवर अचानक नोकर कपातीची वेळ का आली?
एकाच वर्षात मायक्रोसॉफ्टमध्ये तिसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना काढलंजगातील दिग्गज टेक कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांवर सध्या नोकरकपातीची जाण्याची टांगती तलवार आहे. टेक कंपनीने या वर्षातील तिसरा लेऑफ जाहीर केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट Xbox ला बंद करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपला गेमिंग विभाग Xbox मधून ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. याचा फटका कॉर्पोरेट आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना बसणार आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने ॲक्टिव्हिजन ब्लिझार्डच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तर वर्षाच्या सुरुवातीला Xbox ने १,९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
सॅमसंग ३० टक्के कपात करणारटेक जगतातील आणखी एक दिग्गज सॅमसंगनेही टाळेबंदीची घोषणा केली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपल्या जागतिक व्यवसायातील ३० टक्के कर्मचारी काढून टाकत आहे. दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपने जगभरातील त्याच्या सहाय्यक कंपन्यांना विक्री आणि मार्केटींग कर्मचारी सुमारे १५ टक्के आणि प्रशासकीय कर्मचारी ३० टक्के कमी करण्यास सांगितले आहे. याचा परिणाम सॅमसंगच्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही होत आहे. कंपनी भारतातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
२००९ नंतर पीडब्ल्यूसीमध्ये पहिली नोकर कपातटाळेबंदीची तिरी वाईट बातमी सर्वात प्रसिद्ध ऑडिट कंपन्यांपैकी एक पीडब्ल्यूसी म्हणजे प्राइस वॉटरहाऊस कूपरमधून आली आहे. पीडब्ल्यूसी २००९ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे कर्मचारी कमी करणार आहे. याचा फटका युनायटेड स्टेट्स प्रदेशातील अंदाजे १८०० कर्मचाऱ्यांना बसेल. नोकर कपातीचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बिजनेस सर्विस, ऑडिट आणि टॅक्स विभागात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
नोकर कपातीचं कारण आलं समोरनोकर कपातीबाबत बोलताना तीनही मोठ्या कंपन्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. ३ ट्रिलियनपेक्षा जास्त मूल्य असलेल्या Apple नंतर जगातील दुसरी मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टने नोकर कपातीचं कारण सांगितलं. एक्टिव्हिजन ब्लिझार्डला घेतल्यानंतर गेमिंग युनिट मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे रिस्ट्रक्चर करत आहे. त्यामुळे टाळेबंदी केल्याचं सांगण्यात येत आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे, की ही एक नियमित नोकरकपात आहे. त्याचा उद्देश कार्यक्षमता सुधारणे हा आहे. PwC ने म्हटले आहे की ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि भविष्यासाठी काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे.
नवीन तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा ही प्रमुख कारणेनोकर कपातीची कारणे कंपन्यांनी दिली असली तरी याला फक्त हेच कारणीभूत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे परिस्थिती गतिमान झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. नवीन कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहेत. एआय आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक कामांसाठी लोकांचे महत्त्व कमी झाले आहे. ऑटोमेशनमुळे ज्या कामासाठी पूर्वी जास्त लोक लागत होते, तेच काम काही लोकांना करणे शक्य झाले आहे. बाजारातील प्रचंड स्पर्धा हे टाळेबंदीचे आणखी एक प्रमुख कारण आहे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगपूर्वी सोनीने गेमिंग स्टाफ कमी केला होता. सॅमसंगबद्दलच्या एका ET अहवालात असे म्हटले आहे की Xiaomi आणि Vivo सारख्या चीनी स्मार्टफोन कंपन्यांमुळे सॅमसंगचा मार्केटमधील टक्का कमी होत आहे.