Join us

अवघ्या २ लाख रुपयांत सुरू होऊ शकते आईस्क्रीम पार्लर; रोज कमवा हजारो रुपये!, समजून घ्या ५ सोप्या स्टेप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 6:58 AM

उन्हाळा म्हटले की, सर्वप्रथम नजरेसमोर येते ते आईस्क्रीम ! सर्वाधिक फेव्हरेट डेझर्ट म्हणून आईस्क्रीम जगभर खाल्ले जाते. मागील २ वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे आईस्क्रीमचा व्यवसाय थंड होता.

नवी दिल्ली :

उन्हाळा म्हटले की, सर्वप्रथम नजरेसमोर येते ते आईस्क्रीम ! सर्वाधिक फेव्हरेट डेझर्ट म्हणून आईस्क्रीम जगभर खाल्ले जाते. मागील २ वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे आईस्क्रीमचा व्यवसाय थंड होता. यंदा कोरोना प्रभाव नसल्यामुळे आईस्क्रीम बाजारात तेजी दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर आईस्क्रीम पार्लर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. सुमारे २ लाख ते १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीत आईस्क्रीम पार्लर सुरू केले जाऊ शकते.

1. आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी- चांगल्या लोकेशनवर ३०० ते ५०० चौरस फुटांचे दुकान. वीज, पाणी आवश्यकच; पण त्यासोबतच पार्किंगसाठी जागा असेल तर अधिक उत्तम. - डीप फ्रिज, चिलर यासह ग्राहकांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करावी लागेल. वीज गेल्यास जनरेटरची सोय असावी. - सोबत एक ते दोन कर्मचाऱ्यांची गरज लागेल. शक्य असल्यास स्वत:सह परिवारातील सदस्यांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च वाचविला जाऊ शकतो.

2. फ्रँचाइजी अथवा स्वतंत्र मॉडेलअमूल, वाडिलाल आणि क्वालिटी वॉल्स यासारख्या प्रसिद्ध ब्रँडची फ्रँचाइजी तुम्ही घेऊ शकता. एकाच फ्रँचाइजीच्या बंधनात अडकायचे नसेल, तर स्वतंत्र आईस्क्रीम पार्लर उघडून अनेक ब्रँड्सचे आईस्क्रीम तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता.3. फ्रँचाइजी मॉडेलचा लाभतुम्ही फ्रँचाइजी मॉडेल स्वीकारणार असाल तर ब्रँडकडून तुम्हाला मार्केटिंग, ॲडव्हरटायझिंग, बिझनेस आणि प्रमोशन याबाबतीत साह्य मिळू शकते.4. स्वतंत्र मॉडेलचा लाभतुम्ही स्वतंत्र आईस्क्रीम पार्लर उघडणार असाल तर तुमचे फ्रँचाइजी शुल्क वाचेल तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक ब्रँड्सच्या आईस्क्रीमची चव चाखता येईल. विक्री वाढल्यानंतर तुम्ही आपला स्वत:चा ब्रँड विकसित करू शकता.

5. उत्पन्नाचे गणितआईस्क्रीमच्या एमआरपीवर सरासरी २० टक्के मार्जिन असते. तुम्ही ३ लाख रुपयांची विक्री केली तर तुम्हाला ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. अर्थात यातून तुम्हाला रनिंग कॉस्ट काढावी लागेल. आईस्क्रीम व्यतिरिक्त डेअरीची उत्पादने, वेफर्स, चॉकलेट, शेक, पिझ्झा, हॉट चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स, सँडविच आणि भेट वस्तू यासारखी उत्पादनेही तुम्ही विक्रीस ठेवू शकता. यात ३० टक्के मार्जिन असते.

टॅग्स :व्यवसाय