Anand Mahindra: भारतातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (anand mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून, त्यांनी केलेल्या पोस्टवर लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतात. आता महिंद्रा यांनी ट्विटरवर एक प्रेरणादायी स्टोरी पोस्ट केली आहे. ही पोस्ट एका अंध व्यक्तीशी संबंधित आहे, ज्याने दृष्टी नसताना 350 कोटींची कंपनी स्थापन केली.
दृष्टीहीन भावेश करोडोंचा मालकआनंद महिंद्रा यांनी ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे. दृष्टीहीन व्यावसायिक भावेश भाटिया यांचा तो व्हिडिओ आहे. यामध्ये दृष्टी नसतानाही भावेश यांनी जगाला प्रकाशमान करण्याचा व्यवसाय कसा सुरू केला आणि आज हा व्यवसाय उंचीवर नेऊन ठेवला, याबाबत सांगण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भावेश यांनी 28 वर्षांपूर्वी महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅंडल्सची सुरुवात छोट्या प्रमाणावर केली होती. आज कंपनीची वार्षिक उलाढाल 350 कोटी रुपये आहे. इतकंच नाही तर त्यांचा मेणबत्तीचा व्यवसाय अनेकांच्या घराला प्रकाशमान करतोय. ही कंपनी सुमारे 10,000 लोकांना रोजगार देण्याचे कामही करत आहे.
आनंद महिंद्रा यांनी भावेश भाटिया यांचा हा व्हिडिओ शेअर करताना भावनिक कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले, 'तुम्ही जगाला पाहू शकत नाही म्हणून काय झालं. असं काही करा, जगाने तुम्हाला पाहिलं पाहिजे. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात प्रेरणादायी संदेशांपैकी हा एक संदेश आहे. मला लाज वाटते की, ही क्लिप माझ्या इनबॉक्समध्ये येईपर्यंत मला भावेशबद्दल माहिती नव्हती. त्यांच्या या स्टार्टअपमध्ये एक अब्ज युनिकॉर्नपेक्षाही अधिक ताकदीने उद्योजकतेला प्रेरणा देण्याची ताकद आहे. वाढत रहा भावेश!'
भावेश यांनी 1994 मध्ये कंपनी सुरू केलीभावेश भाटियाबद्दल सांगायचे तर, अंध असूनही त्यांनी आपल्या धैर्याच्या बळावर कंपनी सुरू केली. मेणबत्तीचा व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण आज त्यांनी मेहनतीतून करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे. एमए पर्यंत शिकलेल्या भावेश यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एनएबी) मध्ये मेणबत्ती बनवण्याचा कोर्स केला आणि एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर 1994 मध्ये सनराईज कॅंडल्सची स्थापना केली. या व्यवसायातून ते आज जगाला प्रकाशमान करत आहेत.