उद्योगपती आनंद महिंद्रा हे आपल्या सोशल मीडियातील सक्रीयतेमुळे माध्यमांत कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावरील घडामोडींवर आणि नाविन्यतेकडे त्यांचा सातत्याने लक्ष असतं. त्यांना आवडणारे कोट्स, व्हिडिओ किंवा जुगाडचे व्हिडिओ ते ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते अनेकदा खेळाडूंना गाडी भेट देत असल्याचंही जाहीर करतात. यापूर्वी, जुगाडू गाडी बनवलेल्या सांगलीतील एका मॅकेनिकसाठी त्यांनी नवी कोरी बोलेरो गाडी गिफ्ट केली होती. तर, कलाकारांनाही ते दाद देत असतात. आता महिंद्रा यांनी एका मुलीचा व्हिडिओ शेअर केला असून तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, ती तरुणी चित्रकलेचं भन्नाट कौशल्य दाखवताना दिसत आहे. मुलीचं हे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा भारावून गेले असून त्यांनी या मुलीच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. तसेच, जर हे खरं असेल तर ही केवळ कला नाही, चमत्कारच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. व्हिडीओमध्ये ही मुलगी एका मोठ्या टेबलवर प्रत्येकी पाच चित्रं एका ओळीत अशापद्धतीने मांडणी करुन लाकडी पट्ट्यांना पेन बांधून चित्रं साकारताना दिसत आहे. हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे. त्यामुळे ती अवघ्या काही सेकंदांमध्ये एकाच वेळी १५ महापुरुषांचं चित्रं पूर्ण करताना दिसते.
“हे कसं शक्य आहे? तिच्यामध्ये कौशल्य आहे, हे नक्की. मात्र १५ पोट्रेट काढणं हे कलेपेक्षाही फार मोठं कौशल्य आहे. हा चमत्कारच आहे!” असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, “मला कोणी या मुलीच्या जवळ राहणारं किंवा ओळखीचं असल्यास याबद्दलची अधिक माहिती देऊन हे खरं आहे का हे सांगावं. जर, हे खरं असेल तर तिला प्रोत्साहन द्यायला हवं. मी तिला शिष्यवृत्ती आणि इतर पद्धतीची आवश्यक ती सर्व मदत देण्यास इच्छूक आहे,” असं आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन घोषित केलं आहे. सध्या या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून महिंद्रा यांच्या ट्विटलाही नेटीझन्सचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून समर्थनाचं आवाहन
व्हिडीओमधील कलाकार तरुणीने विश्वविक्रम आपल्या नावे केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये व्हॉइस ओव्हरद्वारे स्टोरी सांगण्यात आली आहे. त्यामधील व्यक्ती माहिती देताना सांगते की, “हा एकदम अनोखा विश्वविक्रम आहे. काही दिवसांपूर्वी ही मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला विश्वविक्रम करायचा आहे. मला वाटलं गावातील मुलगी आहे ही काय विश्वविक्रम करणार. मी तिला कोणता विक्रम करणार असं विचारलं असता तिने दिलेलं उत्तर ऐकून मी थक्क झालो,” असं व्हिडीओतील व्हॉइस ओव्हरमध्ये म्हटलं आहे. एका हाताने एकाच वेळी मी १५ थोर व्यक्तींचे चित्रं काढणार आहे असं या मुलीने दावा केला तेव्हा हे शक्य नाही असं वाटतं होतं. हे आव्हान जगात कोणालाच जमलं नाही त्यामुळे ही मुलगी कसं करणार हे असं वाटत असतानाच या मुलीने हे अशक्य काम करुन दाखवलं. हा व्हिडीओ शेअर करुन या मुलीला समर्थन द्या, असं आवाहन व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने केलं आहे.