नवी दिल्ली-
महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना यंदा पद्म पुरस्कारानं (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते सोमवारी आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पण या सन्मानानंतरही आनंद महिंद्रा स्वत:ला या पुरस्कारासाठी योग्य समजत नाहीत. एका ट्विटमधून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि त्याच ट्विटमध्ये महिंद्रा यांनी त्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं आहे.
"केंद्र सरकारनं यंदा पद्म पुरस्कारासाठी मानकरी ठरणाऱ्यांच्या निकषांमध्ये अमूलाग्र बदल केले. आता स्थानिक पातळीवर समाजाच्या सुधारणेसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींवर मुख्य:त्वे लक्ष दिलं जातं. मी अशा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या श्रेणीत सहभागी होण्यासाठी स्वत:ला अयोग्य समजतो", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. यात महिंद्रा यांनी तुलसी गौडा यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान केला जात असतानाचा फोटो देखील ट्विट केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कर्नाटकच्या पर्यावणरवादी तुलसी गौडा यांनी समाजाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला. तुलसी गौडा यांनी ३० हजाराहून अधिक वृक्ष लागवड केली आहे आणि गेल्या सहा दशकांपासून त्या पर्यावरण रक्षणासाठी अविरत काम करत आहेत.
आता फक्त लोकप्रिय व्यक्तींपर्यंत मर्यादित नाही राहिले पद्म पुरस्कारगेल्या काही वर्षांमध्ये देशातील लोकप्रिय व्यक्तींसोबतच आता स्थानिक पातळीवर असमान्य कामगिरी करणाऱ्या नागरिकांनाही पद्म पुरस्कार प्रदान केला जात आहे. यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत एका बाजूला जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, कंगना रणौत, एम.सी.मेरी कोम, आनंद महिंद्रा, पी.व्ही.सिंधू यांच्यासारख्या बड्या व्यक्तींची नावं तर होतीच. तर दुसरीकडे फळ विक्रेता हरेकला हजब्बा, सायकल मॅकेनिक मोहम्मद शरीफ, अब्दुल जब्बार खान, लीला जोशो, तुलसी गौडा, राहीबाई सोमा पोरे यांच्यासारख्या असमान्य कामगिरी केलेल्या सर्वसामान्य नागरिकांचीही नावं पद्म पुरस्कारांमध्ये होती.