मुंबई - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांशी जोडले आहेत. अनेकदा, सर्वसामान्य नेटीझन्सच्या ट्विटला रिप्लाय देतात, तर त्यांच्या जुगाड क्रिएटीव्हीटीचं कौतुकही करतात. देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या आणि प्रेरणादायी युवकांना ते चक्क महिंद्रांच्या चारचाकी नव्या कोऱ्या गाड्याही भेट देतात. त्यामुळे, उद्योगपती आनंद महिंद्रा नेटीझन्सशी अधिकच जोडलेले आहेत. आता, महिंद्रा यांनी कोल्हापुरातील विमानतळाचे फोटो शेअर करत त्याच्या वास्तूकलेचं कौतुक केलंय.
कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, त्यानंतर प्रवाशांच्या सेवेत ते सुरू होईल. इंडियन टेक अंड इन्फ्रा या ट्विटर अकाऊंटवरुन या विमानतळाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रांनी हे ट्विट रिट्विट करत, कोल्हापूरमधील नवीन विमानतळाच्या वास्तूचे कौतुक केलंय.
नागरी उड्डाण मंत्र्यांनी केली पाहणी
काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी व उड्डाण मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूरला भेट दिली होती. त्यावेळी, विमानतळाच्या पाहणीनंतर, विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देशही दिले. तसेच, आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा येथील विमानतळावर पाहायला मिळेल.