Join us

गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 8:46 AM

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आता याच आशियाई स्पर्धेत पदक जिंकत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूसाठी बक्षीसाची घोषणा केली.

मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा हे देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक खेळाडूंचा नेहमीच सन्मान करतात. या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस देऊन देशातील इतर खेळाडूंना किंवा युवकांना प्रेरणादायी संदेश देत असतात. यापूर्वी त्यांनी अनेक क्रिकेटर्स, ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंना महिंद्रा कंपनीच्या वेगवेगळ्या कार भेट देऊन त्यांचा गौरव केला आहे. नुकतेच भारताने आशियाई स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी केली होती. भारताने या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पदके जिंकली आहेत. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एवढं मोठं यश टीम इंडियाला मिळालं. यामध्ये अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आता याच आशियाई स्पर्धेत पदक जिंकत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूसाठी बक्षीसाची घोषणा केली. सोनभद्र येथील रामबाबूने आशियाई स्पर्धेत कास्य पदक जिंकले आहे. पायी चालण्याच्या स्पर्धेत रामबाबूने ब्रांझ मेडल जिंकून भारतीयांच्या शिरपेचार मानाचा तुरा रोवला. मात्र, देशातील कोट्यवधी लोकांना प्रेरणाही दिली आहे. कारण, कधीकाळी हॉटेलमध्ये वेटर, तर कधी मनरेगाच्या कामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या राम बाबूने परिस्थितीशी संघर्ष करुन हे आंतरराष्ट्रीय यश मिळवले आहे. सोनभद्र ते हांगझोऊ हा त्याचा प्रवास संघर्षशाली असल्यानेच देशातील कोट्यवधी गरिबांच्या मुलांसाठी, युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. 

वडिल मजदुरीचं काम करत असल्याने परिस्थितीशी दोन हात आलेच. त्यामुळे, आपल्या आवडीच्या खेळाची तयारी करतानाच मजुरी काम करण्याची वेळ रामबाबूवर आली होती. दरम्यान, बंगळुरू येथे वेटर म्हणूनही काम केलं. मात्र, माझ्या आईने मला मोठा आधारा दिला. माझे स्वप्न पूर्ण होईल का, असा प्रश्न नेहमीच मला पडायचा, तेव्हा स्वप्नापेक्षा सत्यात जगायला शिक, असा मंत्र आईने दिला. त्यामुळे, मी वास्तवाशी स्पर्धा करत पायी चालण्याच्या क्रीडा प्रकारात स्वत:ला झोकून देऊन सराव करत राहिलो, असे राम बाबूने म्हटले. नॉर्दर्न कोल फील्ड लिमिटेडने एथलेटिक्स कँपसाठी रामबाबूची निवड केली. तेथील कोचने मॅराथॉन धाव बदलणे आणि रेस वॉक करण्याची ट्रेनिंग राबबाबूला दिली, ती त्याच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट ठरली.

दरम्यान, रामबाबूची ही संघर्षकहानी ऑशियाई स्पर्धेतील विजयानंतर देशासमोर आली. त्यामुळे, सर्वच स्तरातून रामबाबूचं कौतुक होत आहे. आनंद महिंद्रा यांनीही रामबाबूच्या संघर्षमय प्रवासाचं कौतुक करत, त्याचा गिफ्ट देण्याची इच्छा व्यक्त केलीय. रामबाबूचा नंबर मला कोणी द्या, मी त्याला ट्रॅक्टर किंवा पिअप ट्रक भेट देऊ इच्छितो, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. तसेच, महिंद्रा यांनी रामबाबूची स्टोरी सांगणारा व्हिडिओही शेअर केला आहे.  

टॅग्स :आनंद महिंद्राआशियाई स्पर्धा २०२३उत्तर प्रदेश