Join us

मराठमोळ्या तरुणाच्या कल्पकतेची आनंद महिंद्रांना भुरळ; स्टार्टअपसाठी दिली कोट्यवधींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 1:07 PM

आशय भावे नामक २३ वर्षीय तरुणाने प्लास्टिक कचऱ्यापासून शूज तयार करण्याचे स्टार्टअप सुरू केले आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: देशातील आघाडीच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. देशात असलेल्या हटके गोष्टींचे ते नेहमी कौतुक करत असतात. पण चुकीच्या गोष्टींवरही तेवढीच टीका करताना पाहायला मिळतात. आनंद महिंद्रा आपल्या स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका मराठमोठ्या तरुणाला त्याच्या स्टार्टअपसाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली आहे. या मराठी तरुणाचे नाव आशय भावे असून, तो २३ वर्षांचा आहे. 

आशय भावेचे स्टार्टअप स्टार्टअप प्लास्टिक कचऱ्यापासून शूज बनवते. त्याच्या स्टार्टअपमुळे प्रभावित होऊन उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याला निधी देण्याची ऑफर दिली आहे. आनंद महिंद्रा यांना एका ट्विटद्वारे आशयच्या स्टार्टअपची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आशयच्या स्टार्टअपचे कौतुक केले.

अशा प्रकारच्या स्टार्टअपना प्रोत्साहन दिले पाहिजे

या प्रेरणादायी स्टार्टअपबद्दल माहिती नसल्याची खंत वाटत असल्याचे महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या स्टार्टअपना प्रोत्साहन दिले पाहिजे. एक जोडी बूट खरेदी करणार आहे. हे बूट खरेदी करण्याचा उत्तम मार्ग कोणी सांगू शकेल का? जेव्हा स्टार्टअपसाठी निधी गोळा कराल, तेव्हा आम्हालाही सामावून घ्या, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. 

नॉर्वेच्या मंत्र्यांकडून आनंद महिंद्रांना मिळाली माहिती

नॉर्वेचे माजी मुत्सद्दी मंत्री आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी पर्यावरण प्रमुख एरिक सोल्हेम यांच्या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांना आशयच्या सर्जनशीलतेची माहिती मिळाली. एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटमध्ये 'थैली' आणि आशयवरील एक बिझनेस इनसाइडरचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच स्टार्टअपचे कौतुक केले आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ते ट्विट रिट्विट करत याबाबत माहिती दिली. 

दरम्यान, आशय भावेने जुलै २०२१ मध्ये 'थैली' स्टार्टअप सुरू केले. शूजची एक जोडी बनवण्यासाठी १२ प्लास्टिकच्या बाटल्या आणि १० प्लास्टिक पिशव्या लागतात. शूज बनवताना प्लॅस्टिक पिशव्या उष्णता आणि दाबाच्या मदतीने थेलीटेक्स नावाच्या फॅब्रिकमध्ये बदलतात. नंतर ते शू पॅटर्नमध्ये कापले जाते. रिसायकल करून तयार झालेल्या फॅब्रिकला आरपीईटी (पॉलीथिलीन टेरेफ्थॅलेट) नाव देण्यात आले आहे. ज्याचा वापर अस्तर, शूलेस, पॅकेजिंग आणि इतर भागांसाठी केला जातो. शूजचा सोल रिसायकल केलेल्या रबराचा आहे. कंपनी १० डॉलरच्या किमतीत हे शूज जगात कुठेही पाठवण्यास तयार आहे. दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या १०० अब्ज प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर तोडगा काढणे, हा आशयच्या कंपनीचा उद्देश होता. या प्लास्टिक पिशव्या दरवर्षी १.२ कोटी बॅरल तेल वापरतात आणि दरवर्षी १,००,००० समुद्री प्राण्यांचा जीव घेतात. 

टॅग्स :आनंद महिंद्राव्यवसाय