भारतातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी दोघांचीही प्री-वेडिंग सेरेमनी १ ते ३ मार्चदरम्यान जामनगर येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये जगातील प्रख्यात व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक इंकचे सीईओ लॅरी फिंक हेही सहभागी होणार आहेत. फिंक यांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीही मानलं जातं. ब्लॅकरॉक ही कंपनी जगातील १० ट्रिलीयन डॉलर एवढ्या संपत्तीचं व्यवस्थापन करते. ही मालमत्ता भारताच्या जीडीपीपेक्षा जवळपास अडीचपट आमि अमेरिकेच्या जीडीपीपेक्षा अर्धी आहे. जगातीलल एकूण शेअर आणि बाँड्सपैकी सुमारे १० टक्के शेअर आणि बाँड्सचं व्यवस्थापन ही कंपनी करते, त्यावरून या कंपनीच्या आर्थिक शक्तीचा अंदाज येते.
ब्लॅकरॉक एकप्रकारे जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे. संपूर्ण जग अमेरिकेच्या या मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या कब्जामध्ये आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जगातील प्रत्येक मोठ्या सेक्टरवर या कंपनीचा कब्जा आहे. ब्लॅकरॉक इंकचं मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे. मात्र त्याची गुंतवणूक ही संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. जगातील प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये याची गुंतवणूर आहे. चीनही या कंपनीला आपल्या देशात येण्यापासून अडवू शकलेलं नाही. जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये ५.१९ आणि अॅपलमध्ये ५.१४ टक्के भागीदारी आहे. त्याचप्रमाणे अॅमेझॉन, एनविडीया, गुगल, मेटा आणि टेस्ला या कंपन्यांमध्येही ब्लॅकरॉकची गुंतवणूक आहे. भारतातीलही अनेक कंपन्यांमध्ये ब्लॅकरॉकची भागीदारी आहे. यावरून या कंपनीच्या आर्थिक शक्तीचा अंदाज येतो.
ब्लॅकरॉक इंक कंपनीची स्थापना १९८८ मध्ये लॉरी फिंक यांनी केली होती. फिंक हे या कंपनीचे सीईओ आणि चेअरमन आहेत. फिंक यांनी पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलं होतं. मात्र नंतर ते शेअर बाजारात घुसले आणि यशस्वी झाले. मग त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. त्यांनी स्थापन केलेली ब्लॅकरॉक कंपनी आज जगभरामध्ये कंपन्या आणि सरकारांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करते. यामध्ये पेन्शन फंडाचाही समावेश आहे.
२००८ मध्ये जेव्हा आर्थिक संकटामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या अडचणीत आल्या असताना अमेरिकेच्या सरकारने ब्लॅकरॉकची मदत घेतली होती. मात्र या संकटाचं मूळ ब्लॅकरॉकच होतं, असंही म्हटलं जातं. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाच्या संकटकाळात बाँड मार्केट कोलमडल्यावर पुन्हा एकदा ब्लॅकरॉकने परिस्थिती सांभाळली होती. फिंक यांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुकेश अंबानी यांची भेट घेतली होती.