Hyundai Motor IPO News: ह्युंदाईचा आयपीओ आज अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. तर, किरकोळ गुंतवणूकदारांना उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ प्रायमरी मार्केटमधील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे. कंपनी प्राथमिक बाजारातून २८,८७०.१६ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल. ह्युंदाईपूर्वी सर्वात मोठा आयपीओ सरकारी विमा कंपनी एलआयसीनं आणला होता.
कंपनीसाठी आज मोठा दिवस
ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ १४ ऑक्टोबरला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कंपनी ८२१५.२८ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करतेय. सोप्या शब्दात सांगायचं तर, अँकर गुंतवणूकदार असे गुंतवणूकदार आहेत जे एकाच वेळी अधिक आयपीओंवर पैसे गुंतवतात. लिस्टिंगच्या दिवशी अँकर गुंतवणूकदार आपले पैसे काढू शकत नाहीत. कंपनी त्यांचे पैसे सरासरी ३० दिवस ते ६ महिने लॉक ठेवते. मुदत संपल्यानंतरच ते शेअर्सची विक्री करू शकतात.
किरकोळ गुंतवणूकदारांना उद्यापासून संधी
किरकोळ गुंतवणूकदार उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ १७ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. आयपीओसाठी कंपनीनं १८६५ ते १९६० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केलाय. ह्युंदाईने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण ७ शेअर्सचा लॉट तयार केलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १३ हजार ७२० रुपये मोजावे लागतील. ह्युंदाई मोटर इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर १८६ रुपयांची सूट दिलीये.
ग्रे मार्केट गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी
इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीची स्थिती फारशी चांगली नाही. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून ही दिलासादायक बाब आहे की, कालपासून आयपीओच्या जीएमपीमध्ये बदल झालेला नाही. आज ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ ६५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रे मार्केटमध्ये ह्युंदाईच्या शेअरचं स्थान खूपच कमकुवत झालंय.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)