Join us

गौतम अदानींना आंध्र प्रदेश सरकारचं नवीन वर्षाचं गिफ्ट! चंद्राबाबू नायडू यांनी दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:34 IST

Chandrababu Naidu-Gautam Adani Update: चंद्राबाबू नायडू म्हणाले, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही समूह कंपनीला दिलेल्या कंत्राटातून माघार घेऊ शकत नाही.

Adani Group News : उद्योगपती गौतम अदानी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तमिळनाडूच्या द्रमूक सरकारने मोठा प्रकल्प रद्द करत धक्का दिला होता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अदानी यांच्या दक्षिणेकडील राज्यातूनच चांगली बातमी आली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला आंध्र प्रदेश सरकारकडून दिलासा मिळाल्याची ही बातमी आहे. आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारने अदानी समूहाच्या ग्रीन एनर्जी कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत अदानी समूहावरील आरोपांबाबत ठोस पुरावे समोर येत नाहीत आणि आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत राज्य सरकार समूहाविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही कंपनीला दिलेल्या कंत्राटातून माघार घेऊ शकत नाही. कारण असे केल्यास राज्य सरकारला मोठा दंड भरावा लागू शकतो. या प्रकरणी जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कारवाई केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आम्हाला आणखी पुरावे हवे असून पुरावे मिळाल्यानंतरच ठोस कारवाई केली जाईल. यापूर्वी, अदानी ग्रुप कंपनी आणि चेअरमन यांच्यावर लाचखोरीचे आरोप अमेरिकेत समोर आल्यानंतर, चद्राबाबू नायडू यांनी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

नोव्हेंबर २०२४ मध्ये अदानी समूहावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले होते. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने अदानी ग्रीन एनर्जीशी संबंधित पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट (PPA) रोखण्याच्या निर्णयावर विचार करत होते. राज्य सरकार सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अदानी ग्रीन एनर्जी यांच्याशी झालेला वीज खरेदी करार रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली होती. या प्रकरणी केंद्रीय एजन्सीकडे चौकशीसाठी शिफारस करण्याची शक्यता होते.

वीज खरेदी करारांतर्गत, आंध्र प्रदेश सरकारला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ७००० मेगावॅट सौर ऊर्जा खरेदी करायची आहे. यूएस अधिकाऱ्यांनी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर ७ जणांवर भारतातील ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांना २०२१ ते २०२२ दरम्यान सौर प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या २ कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन आणि अझूर पॉवर यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :गौतम अदानीअदानीआंध्र प्रदेशचंद्राबाबू नायडू