Join us

अनिल अग्रवाल Vedanta मधील ९ कोटी शेअर्स विकणार, ४००० कोटी उभारण्याचा प्लान; जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:03 AM

Vedanta Anil Agarwal : वेदांता लिमिटेडचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत ८३ टक्क्यांनी वधारले आहेत. तर दुसरीकडे या वर्षी सेन्सेक्समध्ये आतापर्यंत ७ टक्के वाढ झाली आहे.

Vedanta Anil Agarwal : अब्जाधीश अनिल अग्रवाल यांची वेदांता रिसोर्सेस ब्लॉक डीलद्वारे वेदांता लिमिटेडमधील २.५ टक्के हिस्सा किंवा ९ कोटी शेअर्सची विक्री करू शकते. ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, वेदांता रिसोर्सेस सुमारे ४,००० कोटी रुपये उभारण्यासाठी ही विक्री करणार आहे. हा करार आंतरराष्ट्रीय बँकेकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. वेदांता लिमिटेडचा प्रवर्तक गट वेदांता रिसोर्सेस आहे.

या बातमीमुळे वेदांता लिमिटेडचा शेअर ४६९.९५ रुपयांवर बंद झाला. एका दिवसापूर्वीच्या तुलनेत या शेअरमध्ये किंचित घसरण दिसून आली. वेदांता लिमिटेडचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत ८३ टक्क्यांनी वधारले आहेत. तर दुसरीकडे या वर्षी सेन्सेक्समध्ये आतापर्यंत ७ टक्के वाढ झाली आहे.

वेदांता रिसोर्सेसचा हिस्सा

ब्रिटनस्थित वेदांता रिसोर्सेसकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत वेदांता लिमिटेडमध्ये सहा उपकंपन्यांच्या माध्यमातून ६१.९५ टक्के हिस्सा होता. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात वेदांता रिसोर्सेसची उपकंपनी फिनसिडोर इंटरनॅशनलने वेदांता लिमिटेडचे ६.५५ कोटी शेअर्स १,७०० कोटी रुपयांना विकले होते. हा शेअर २६५.१४ रुपये प्रति शेअर दरानं विकण्यात आला. त्यानंतर वेदांताचे शेअर्स ७७ टक्क्यांनी वधारले आहेत.

कंपनीवर मोठं कर्ज

३१ मार्च २०२४ पर्यंत वेदांता समूहावर १२.३५ अब्ज डॉलरचं निव्वळ कर्ज होतं. यातील ४९ टक्के रक्कम रुपयात तर उर्वरित रक्कम परकीय चलनात होती. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत वेदांतानं ६५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभांश वितरित केला आहे. वेदांता रिसोर्सेसला लाभांशातून सुमारे ४४,००० कोटी रुपये मिळाले, ज्यामुळे मूळ कंपनीला या कालावधीत निव्वळ कर्ज ९.७ अब्ज डॉलरवरून ६ अब्ज डॉलरवर आणण्यास मदत झाली. पुढील तीन वर्षांत कर्ज तीन अब्ज डॉलरपर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय.

वेदांता समूहाने नजीकच्या काळात एबिटाच्या १० अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नासाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे, ज्यात झिंक, अॅल्युमिनियम, ऑईल अँड गॅस आणि वीज व्यवसायांसह ५० हून अधिक विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा समावेश आहे. वेदांता समूहातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) हिस्सा मार्च तिमाहीअखेर ८.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो डिसेंबर तिमाहीत ७.७४ टक्के होता.

टॅग्स :व्यवसाय