Join us

अनिल अंबानी यांच्या हाती मोठा प्रकल्प; 'या' देशासोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 20:31 IST

Reliance Enterprises: अनिल अंबानी यांची कंपनी 1270 मेगावाटचा सोलर-हायड्रोपॉवर प्रोजेक्ट उभारणार आहे.

Reliance Group: काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) यांची परिस्थिती हळुहळू सुधारत आहे. त्यांच्यावरील बहुतांश कर्ज फिटले असून, त्यांच्या कंपन्याही चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान, आता अनिल यांच्या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. रिलायन्स ग्रुप भूतानमध्ये (Bhutan) 1270 मेगावॅट वीज निर्मितीसाठी सौर आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. यासाठी कंपनीने Druk Holding and Investments Ltd सोबत करार केला आहे. ही भूतानच्या रॉयल सरकारची गुंतवणूक कंपनी आहे. 

स्टॉक एक्स्चेंजसह नियामक फाइलिंगमध्ये रिलायन्स समूहाने सांगितले की, त्यांनी भूतान सरकारच्या व्यावसायिक आणि गुंतवणूक युनिट ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडशी एक धोरणात्मक करार केला आहे. या करारानुसार कंपनी भूतानमध्ये रिन्यूएबल एनर्जी आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रातील सौर आणि जलविद्युत क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. अनिल अंबानी यांच्या उपस्थितीत हरमनजीत सिंग नेगी(अध्यक्ष कॉर्पोरेट डेव्हलपमेंट, रिलायन्स पॉवर लिमिटेड) आणि उज्ज्वल दीप दहल (सीईओ, ड्रुक होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट) यांनी करारावर स्वाक्षरी केली.

रिलायन्स एंटरप्रायझेस ड्रुक होल्डिंगच्या सहकार्याने भूतानमधील गेलेफु माइंडफुलनेस सिटीमध्ये 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. पुढील दोन वर्षांत दोन टप्प्यांत 250 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण विकसित झाल्यानंतर हा भूतानमधील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असेल. भूतानमधील रिन्यूएबल क्षेत्रात भारतीय कंपनीची ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असेल. सौर प्रकल्पाव्यतिरिक्त, रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि ड्रुक होल्डिंग मिळून 770 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्पदेखील उभारणार आहेत.

 

टॅग्स :अनिल अंबानीव्यवसायगुंतवणूकभूतान