Join us

अनिल अंबानी यांना मोठा झटका; सरकारने पाठवली 922 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 5:10 PM

आधीपासूनच अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Anil Ambani: आधीपासूनच अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सरकारने त्यांना 922.58 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवली आहे. जीएसटी चोरी आणि थकबाकीवर लक्ष ठेवणाऱ्या DGGI ने अनिल अंबानींना 4 वेगळ्या नोटिसा पाठवल्या आहेत. रिलायन्स कॅपिटलचे युनिट असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीशी संबंधित व्यवहारांवर त्यांना या नोटिसा मिळाल्या आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊ...

GST इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला (RGIC) री-इंश्युरन्स कमीशन आणि को-इंश्युंरन्स प्रीमियमवरील GST बाबत नोटीस पाठवली आहे. यासोबतच अनिल अंबानींच्या या विमा कंपनीला इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला, री-इन्शुरन्स सेवा आयात केल्या आणि त्यावर जीएसटी भरला नाही, याबाबतही नोटीस पाठवण्यात आली आहे.

अनिल अंबानींना या 4 नोटिसा पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, डीजीजीआयने अनिल अंबानींना 4 नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये त्यांच्याकडून 478.84 कोटी रुपये, 359.70 कोटी रुपये, 78.66 कोटी रुपये आणि 5.38 कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला त्यांच्या तिमाही निकालांमध्ये ही माहिती द्यावी लागेल.

रिलायन्स कॅपिटलची सर्वात मोठी कंपनीअनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलला सध्या NCLT कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कंपनीवर कर्जाचा बोजा आहे. रिलायन्स कॅपिटलचे सर्वात मोठे युनिट म्हणजे, रिलायन्स जनरल इन्शुरन्स. रिलायन्स कॅपिटलचे 70 टक्के मूल्य हे फक्त रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे आहे.

अनिल अंबानी दीर्घकाळापासून अडचणीत आहेत. यापूर्वी त्यांच्या दूरसंचार कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांच्यावर 500 कोटींहून अधिक रक्कम भरण्यासाठी दबाव होता. त्यांनी तसे केले नसते, तर त्यांना तुरुंगात जावे लागले असते. तेव्हा त्यांचा मोठा भाऊ, मुकेश अंबानी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सव्यवसायजीएसटीपैसागुंतवणूकमुकेश अंबानी