नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील (एलपीजी) ‘सबसिडी’ घेणे बंद केले असून आपल्या समूहातील एक लाख कर्मचाऱ्यांनाही स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील श्रीमंतांना स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी घेणे थांबविण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनास मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, उदय कोटक, अनिल अग्रवाल, गौतम अदानी आणि किशोर बियाणी यांंनी याआधीच प्रतिसाद दिला. आता या यादीत अनिल अंबानींंचे नाव समाविष्ट झाले.
आपल्या कंपनी समूहातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी पाठविलेल्या संदेशात अंबानींनी ही माहिती दिली. संदेशामध्ये त्यांनी म्हटले की, रिलायन्स समूहाचे नेतृत्व करणाऱ्या फळीने एलपीजीची सबसिडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बाजारदरानुसार एलपीजी खरेदी करण्याची क्षमता आहे त्यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन राष्ट्र उभारणीस हातभार लावावा. मोदी यांनी गेल्या महिन्यात श्रीमंतांना एलपीजी सबसिडी सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘गिव्ह इट अप’ ही मोहीम सुरू केली होती. मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांसह तीन लाखांहून अधिक लोकांनी सबसिडी सोडली आहे.