Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या १० दिवसांपासून या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. आज रिलायन्स पॉवरचा शेअर मागील बंदच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वधारून ३८.१५ वर उघडला आणि त्यावर ब्लॉक करण्यात आला. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची आज बैठक होणार असून, त्याआधी सलग चौथ्या दिवशी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं. गेल्या आठवड्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी या शेअरनं उच्चांक गाठला होता.
कर्जमुक्त झाली कंपनी
गेल्या आठवड्यात रिलायन्स पॉवरनं विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडसाठी (व्हीआयपीएल) गॅरंटर म्हणून आपल्या सर्व जबाबदाऱ्यांचं सेटलमेंट केल्याची घोषणा केली होती. या सेटलमेंटमुळे व्हिआयएलच्या ३८७२.०४ कोटी रुपयांच्या थकित कर्जाची कॉर्पोरेट गॅरंटी, अंडरटेकिंग्स आणि त्याच्याशी संबंधित दायित्व आणि दाव्यांतून मुक्त झाली आहे.
रिलायन्स पॉवरनं व्हीआयपीएलसाठी गॅरंटर म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे निकाली काढल्या आहेत, ज्यामुळे कॉर्पोरेट गॅरंटी आणि इतर सर्व दायित्वातून सूट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं होतं. कंपनीच्या या निर्णयानंतर विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड आता रिलायन्स पॉवरची उपकंपनी राहिलेली नाही.
Reliance Infrastructure मध्येही तेजी
तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही आज २ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्यानंतर कंपनीच्या शेअरनं ३२३ रुपयांच्या दिवसातील उच्चांकी पातळी गाठली. याआधी शुक्रवारी या शेअरमध्ये १२ टक्क्यांहून अधिकची बंपर वाढ नोंदवली होती, त्यानंतर शेअर ३२० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आला. कंपनीनं क्यूआयपीच्या माध्यमातून ३,०१४ कोटी रुपये उभारण्याच्या घोषणेनंतर शेअर्समध्ये ही वाढ दिसून येत आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)