Anmol Ambani On Lockdown: उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनवर ताशेरे ओढले आहेत. "राजकीय नेते रॅलीचं आयोजन करत आहेत आणि चित्रपटांचं शुटिंगही सुरू आहे. पण उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत", असं खोचक ट्विट अनमोल अंबानी यांनी केलं आहे. थेट अंबानी कुटुंबातून लॉकडाऊनवर टीका झाल्यानं याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांना सुरुवात झाल्यानंतर अनमोल अंबानी यांनी एक ट्विट केलं आहे. "अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? कलाकार शुटिंग करत आहेत. राजकीय नेते मोठ्या संख्येनं रॅली करत आहेत. पण तुमचा उद्योग आणि काम हे अत्यावश्यक नाही! प्रत्येक व्यक्तीला त्याचं काम अत्यावश्यक असतं", असं ट्विट अनमोल अंबानी यांनी केलं आहे.
What does essential even mean? EACH INDIVIDUALS WORK IS ESSENTIAL TO THEM. #scamdemic
— Anmol A Ambani (@anmol_ambani) April 5, 2021
महाराष्ट्रात कडक निर्बंध
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सोमवारपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार राज्यात खासगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. तर हॉटेल्स, रेस्टॉरंट, मनोरंजनाची ठिकाणं पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्य सरकारनं लागू केलेले नवे नियम ३० एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. यात अत्यावश्यक सेवा म्हणजेच किराणा माल, मेडिकल, दवाखाने यांना वगळलं आहे.