Anil Ambani Stock : उद्योगपती अनिल अंबानी यांचे खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू झाल्याचे म्हणावे लागेल. असंख्य अडचणीवर मात करत अंबानी यांनी मार्केटमध्ये दमदार पुनरागमन केलंय. रसातळाला गेलेल्या त्यांच्या कंपन्या नवसंजीवनी मिळाल्यासारख्या उभ्या राहत आहेत. अंबानी ग्रुपच्या २ कंपन्यांचे शेअर्स अचानक रॉकेट झाले आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांसोबत बाजारातील तज्ञांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांनाही मालामाल करण्याची आशा निर्माण झाली आहे. आजही रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे. आता रिलायन्स पॉवरचे शेअर्सही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असून एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना ६९.७९ टक्के परतावा दिला आहे. आपण गेल्या ५ दिवसांबद्दल बोललो तर या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना २३.२६ टक्के परतावा दिला आहे. ५ दिवसांपूर्वी बुधवार, २५ सप्टेंबर रोजी हा शेअर ४१.४५ रुपये प्रति शेअर होता. आज त्यात ५१.०९ रुपयांची वाढ दिसून आली आहे.
अनिल अंबानींच्या अन्य कंपनीचे शेअर्सही वधारले
आज, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर १ ते १.५ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. रिलायन्स पॉवरनंतर, हा दुसरा शेअर आहे जो वाढतो आहे. आज रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची बोर्ड मिटिंगही होत असून त्यात महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
रिलायन्स पॉवरचे शेअर्स का वाढत आहेत?
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागील सर्वात मोठे कारण समोर आलं आहे. रिलायन्सने विदर्भ इंडस्ट्रीजसाठी हमीदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याची घोषणा केली आहे. अंदाजे ३ हजार ९०० कोटी रुपयांची सेटलमेंट पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे एक्सचेंजेसना कळवण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने अलीकडेच जाहीर केली होती. रिलायन्स पॉवरने नुकतेच मोठ्या प्रमाणात बॅटरी स्टोरेज प्रकल्पाबाबत घोषणा केली आहे. यानंतर बाजार आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या प्रकल्पामध्ये ५०० MW/१००० MWh चा पॉवर क्लेम करण्यात आला आहे.
या सर्व बातम्यांचा सकारात्मक परिणाम
या सर्व बातम्यांचा सकारात्मक परिणाम झाल्याने रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. शेअर्स सतत ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला लागत आहेत. आज शेअर्स पुन्हा ५ टक्क्यांच्या वाढीसह वरच्या सर्किटला गेले. शेअर २.४३ रुपये किंवा ४.९९ टक्क्यांच्या वाढीसह ५१.०९ रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे.