Anil Ambani Stocks: उद्योगपती अनि अंबानींसाठी आजचा दिवस(23 ऑक्टोबर 2024) खुप चांगला ठरला. त्यांच्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेड (रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी) कंपनीने काल (22 ऑक्टोबर 2024) रत्नागिरीमध्ये शस्त्रे बनवण्याचा कारखाना उभारण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच, आजच्या सत्रात अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स वधारले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये आज अप्पर सर्किट लागले.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर आज 5 टक्क्यांच्या किंवा 12.70 रुपयांच्या उसळीनंतर 267.25 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, रिलायन्स पॉवरचे शेअर्स 1.92 रुपये किंवा 5 टक्क्यांच्या वाढीसह 40.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या शेअरने 2024 मध्ये 28 टक्के, एका वर्षात 53 टक्के, 2 वर्षात 92 टक्के आणि 5 वर्षात 900 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने 2024 मध्ये 73 टक्के, एका वर्षात 140 टक्के आणि 5 वर्षांत 1100 टक्के परतावा दिला आहे.
गेल्या काही काळापासून अनिल अंबानी यांच्याशी संबंधित दोन्ही कंपन्या चर्चेत आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये रिलायन्स पॉवरने सांगितले होते की, कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स पॉवरने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे हमीदार म्हणून 3872.04 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची परतफेड केली. याशिवाय, रिलायन्स इन्फ्राने 3831 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली असून, आता फक्त 475 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
याशिवाय, कंपनीला भूतानमध्ये 1270 मेगावॅट वीज निर्मितीसाठी सौर आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. तसेच, आता अनिल अंबानींची डिफेन्स कंपनी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रत्नागिरीत शस्त्र निर्मितीचा कारखाना उभारणार आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)