Join us

कर्जामुळे अनिल अंबानींना विकावा लागला महत्वाचा बिझनेस, 19 हजार कोटींमध्ये अदानीने विकत घेतली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 1:37 PM

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय विकावा लागला आहे.

ठळक मुद्देरिलायन्स एनर्जीचे मुंबई शहरात 30 लाख ग्राहक असून यापुढे या सर्व ग्राहकांना अदानींच्या नावे वीज बिले जातील. रिलायन्स एनर्जी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करते. 

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय विकावा लागला आहे. अदानी समूहाने अनिल अंबानींकडून रिलायन्स एनर्जीचा मुंबईतील व्यवसाय 18,800 कोटी रुपयांना विकत घेतला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत येणारी रिलायन्स एनर्जी इलेक्ट्रीसिटी जनरेशन, ट्रांसमिशन आणि वितरणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अदानी ट्रान्समिशन आता रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय संभाळणार आहे. 

अदानी समूहाने रोख रक्कमेच्या करारातंर्गत हा व्यवहार केला आहे. रिलायन्स एनर्जीचे मुंबई शहरात 30 लाख ग्राहक असून यापुढे या सर्व ग्राहकांना अदानींच्या नावे वीज बिले जातील. अलीकडच्या काळातील ऊर्जा क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये गुरुवारी शेअर्स खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर हा व्यवहार प्रत्यक्षात येईल. रिलायन्स एनर्जी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करते. 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जालान यांनी या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. 15 हजार कोटीचे कर्ज फेडल्यानंतर 3 हजार कोटी शिल्लक राहतील. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आणि डिफेंस सेक्टरवर लक्ष केंद्रीत करणार आहे. कर्ज नसल्यामुळे आता बाजारातून पैसे उचलणे अधिक सोपे होईल असे अनिल जालान यांनी सांगितले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे 10 हजार कोटी मुल्याचे प्रकल्प आहेत. रिलायन्स इन्फ्रा ही भारतातील दुस-या क्रमांकाची कंस्ट्रक्शन कंपनी आहे. 

1.78 अब्ज डॉलरचं कर्जामुळे चिनी बॅंकेने अनिल अंबानींच्या कंपनी विरोधात दाखल केली याचिकाआरकॉम अनिल अंबानी ग्रुपचा भाग आहे. आरकॉमला चायना डेव्हलपमेंट बॅंकेने 1.78 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं होतं. जवळपास 6 वर्षांपूर्वी सिंडीकेट ऑफ चायनीज बॅंक आणि अन्य संस्थांनी हे कर्ज 10 वर्षांसाठी दिलं होतं, यामध्ये सीडीबीचाही समावेश होता. सिंडीकेटने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याची ती पहिलीच वेळ होती असं सांगितलं जातंय. यासोबतच आरकॉमने 600 मिलियन डॉलरचा अतिरिक्त करार सीडीबीसोबत केला होता. पण कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे आऱकॉम विरोधात एनसीएलटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.  

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स कम्युनिकेशन