नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची उपकंपनी ‘जीसीएक्स’ने दिवाळखोरीचा अर्ज केला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स आधीच दिवाळखोरीत गेली आहे. जीसीएक्स ही जगातील सर्वांत मोठी समुद्राखालील केबल सीस्टिम असलेली कंपनी आहे. कंपनीचे ७ टक्के रोखे (बॉन्ड्स) १ आॅगस्टला परिपक्व झाले असून, त्यापोटी देय असलेले ३५० दशलक्ष डॉलर अदा करण्यात कंपनीला अपयश आले आहे. त्यामुळे कंपनीने दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला आहे.
अनिल अंबानी हे सध्या कर्जाशी लढत आहेत. त्यांच्या रिलायन्स समूहाने विविध मालमत्ता विकून २१,७०० कोटीे उभे करण्याची घोषणा केली आहे. रस्त्यांपासून रेडिओ स्टेशन्सपर्यंतच्या मालमत्तांचा यात समावेश आहे. या विक्रीतून उभा राहणारा निधी कर्जफेडीसाठी वापरण्यात येणार आहे. भारत सध्या वाईट कुकर्ज संकटातून जात आहे. अधिक गंभीर बनलेले शॅडो-बँकिंग संकट आणि दिवाळखोरी नियमातील अडथळे यामुळे कुकर्जाची समस्या अधिक बिकट होत आहे.
>मानांकन मागच्याच महिन्यात गेले खाली
जीसीएक्सने म्हटले होते की, रोखेधारकांसोबत केलेल्या करारामुळे परिपक्वतेच्या पर्यायाशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यास वेळ मिळाला आहे. ‘मूडीज इन्व्हेस्टर्स’ ने कंपनीचे मानांकन गेल्याच महिन्यात कमी करून ‘सीए’ केले आहे. रोख्यांचे ३५० दशलक्ष डॉलर देऊ न शकल्यामुळे कंपनी आता थकबाकीदार समजली जात आहे. कंपनीने डेलावेअर न्यायालयात चॅप्टर ११ अन्वये दिवाळखोरी अर्ज केला आहे.
अनिल अंबानी यांच्या आरकॉमच्या उपकंपनीचा दिवाळखोरीसाठी अर्ज
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची उपकंपनी ‘जीसीएक्स’ने दिवाळखोरीचा अर्ज केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:23 AM2019-09-17T04:23:09+5:302019-09-17T04:23:23+5:30