बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) रिलायन्स समूहाचे (Reliance Group ADAG) प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडवर कथित फसवणूक केल्याप्रकरणी रोखे बाजारातून बंदी घातली आहे. सेबीची ही कारवाई अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश आर शाह या तीन जणांवरही झाली आहे.
"सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा कोणत्याही सार्वजनिक कंपनीचे कार्यवाहक संचालक/प्रवर्तक, जे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याशी संबंधित घटकांना स्वतःला जोडण्यास मनाई आहे," असं सेबीनं आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. तसंच हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. कंपनीशी निगडीत कथित अनियमिततांबाबत २८ व्यक्ती आणि युनिट्सविरोधात सेबीनं १०० पानी ऑर्डर जारी केली आहे. तसंच या तपासात २०१८-१९ मध्ये RHFL द्वाके अनेक कर्ज घेणाऱ्यांना कर्ज देण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्यात आलं आहे.
सध्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनॅन्सच्या शेअर्सवर मोठा दबाव आहे. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी रिलायन्स होम फायनॅन्सचे शेअर १.४० टक्क्यांनी घसरून ४.९३ रुपयांवर पोहोचले होते. कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल सांगायचं झालं तर ते सध्या २३८.८९ कोटी रुपये आहे.