Vodafone Idea Share: देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी व्होडाफोन आयडियाचे शेअर्स आज बुधवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर्स आज इंट्राडे नीचांकी 13.83 रुपयांवर पोहोचले होते.
शेअर्सच्या या घसरणीमागे मोठं कारण आहे. खरं तर, दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या व्होडाफोन आयडियाच्या बोर्ड सदस्यांनी मंगळवारी इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांद्वारे 20,000 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली, ज्यामध्ये कंपनीचे प्रवर्तक देखील सहभागी होतील. यासोबतच व्होडाफोन आयडियानं सांगितलं की, इक्विटी आणि डेटच्या माध्यमातून सुमारे 45,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
काय आहे अधिक माहिती?
गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेली ही कंपनी सध्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कंपनीवर सुमारे 2.1 लाख कोटी रुपयांचं मोठं कर्ज आहे आणि ग्राहकांच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना तिला तिमाही तोट्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, टेलिकॉम कंपनीनं एक निवेदन जारी केलं आहे. तिच्या संचालक मंडळानं इक्विटी आणि/किंवा इक्विटीशी निगडीत माध्यमांमधून 20,000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकर्स आणि सल्लागारांची नियुक्ती करण्याचे अधिकारही व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
कंपनी या प्रस्तावाला 2 एप्रिल रोजी होणाऱ्या भागधारकांच्या बैठकीत मंजुरी घेईल. येत्या तिमाहीत इक्विटी फंड उभारण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. इक्विटी वाढवण्याच्या प्रक्रियेत प्रवर्तक देखील सहभागी होतील. कंपनीनं सांगितलं की, इक्विटी फंड उभारल्यानंतर, ती लोन फायनान्सिंगसाठी त्यांच्या कर्जदात्यांसह सक्रियपणे काम करेल. इक्विटी आणि डेटच्या मदतीनं सुमारे 45,000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचं बँक कर्ज सध्या 4,500 कोटी रुपयांपेक्षा कमी असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
इक्विटी आणि डेट फंड उभारल्यानंतर, कंपनी 4G कव्हरेज, 5G नेटवर्क रोलआउट आणि क्षमता विस्तारासाठी गुंतवणूक करण्यास सक्षम असेल. यामुळे कंपनीला आपली स्पर्धात्मक स्थिती सुधारता येईल आणि ग्राहकांना चांगला अनुभव देता येईल असं कंपनीनं म्हटलंय
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांना सल्ला घेणं आवश्यक आहे.)