Anil Ambani News : कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्या वेगानं कर्ज फेडत आहेत. अनिल अंबानींच्या आणखी एका कंपनीनं ८५० कोटी रुपयांचं कर्ज फेडसं असून ती कंपनीही कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रोझा पॉवरनं सिंगापूरच्या वर्डे पार्टनर्स या कंपनीचं ८५० कोटी रुपयांचं कर्ज फेडलं आहे. रिलायन्स पॉवरनं कर्जमुक्त होण्याच्या यशानंतर आता रोझा पॉवरही कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढील तिमाहीत उर्वरित कर्जाची परतफेड करून चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरजवळील रोजा गावात १२०० मेगावॅटक्षमतेचा कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प चालविणाऱ्या रोझा पॉवरकडे केवळ वर्डे पार्टनर्सचं कर्ज आहे. रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळानं सोमवारी एका प्रीफरेन्शिअल इश्यूला मंजुरी दिली, ज्यात प्रवर्तक रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून ६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम येणार आहे. उर्वरित ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि सनातन फायनान्शिअल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस करणार आहेत. रेग्युलेटरी माहितीनुसार, कंपनीच्या प्रेफरेंशियल इश्यूमुळे रिलायन्स पॉवरची नेटवर्थ ११,१५५ कोटी रुपयांवरून १२,६८० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
रिलायन्स पॉवरचा शेअर
रिलायन्स पॉवरच्या शेअरला गुरुवारी सलग सातव्या दिवशी अपर सर्किट लागलं. गुरुवारी हा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह ४४.१५ रुपयांवर आला. या तेजीसह कंपनीचं मार्केट कॅप १७ हजार कोटी रुपयांपार गेलं. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स पॉवरच्या एका प्लांटवर सध्या गौतम अदानी यांची नजर आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)