दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी आणखी एक डील केली आहे. अदानी समूहाच्या सिमेंट कंपनी ACC लिमिटेडनं सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. एशियन काँक्रिट्स अँड सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (Asian Concretes and Cements Private Limited) मधील ५५ टक्के हिस्सा खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं. एसीसीनं एशियन काँक्रीट आणि सिमेंट्सच्या विद्यमान प्रवर्तकाकडून हा स्टेक खरेदी केला आहे. एसीसी लिमिटेडकडे आता एशियन काँक्रीट आणि सिमेंटची पूर्ण मालकी आहे. सोमवारी कामकाजादरम्यान एसीसीचे शेअर्स २४०० रुपयांच्या पातळीवर जोरदार व्यवहार करत होते.
एसीसी लिमिटेडनं एसीसीपीएलमधील (ACCPL) ५५ टक्के हिस्सा ७७५ कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यात विकत घेतला आहे. एंटरप्राइझ मूल्यामध्ये ३५ कोटी रुपयांची कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट यांचा समावेश आहे.
एसीसी लिमिटेडकडे एसीसीपीएलमध्ये आधीच ४५ टक्के हिस्सा आहे. एसीसीनं या डीलसाठी अंतर्गत स्त्रोतांकडून फंड उभा केला आहे. या करारामुळे एसीसी आणि तिची मूळ कंपनी अंबुजा सीमेंट्स उत्तर भारतातील किफायतशीर सीमेंट मार्केटमध्ये त्यांचे स्थान आणखी मजबूत करण्यात मदत करेल.
एसीसीपीएलची कॅपॅसिटी किती?
एशियन काँक्रिट्स अँड सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडची (ACCPL) हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे १.३ एमटीपीए सिमेंट क्षमता आहे. त्याच वेळी, त्याची उपकंपनी एशियन फाईन सीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडची (AFCPL) राजपुरा, पंजाब येथे १.५ एमटीपीए सीमेंट क्षमता आहे. या धोरणात्मक करारानंतर एसीसीची सीमेंट क्षमता वाढली आहे. आता एसीसीची सीमेंट उत्पादन क्षमता ३८.५५ एमटीपीए झाली आहे. त्याच वेळी, मूळ कंपनी अंबुजा सह त्याची सीमेंट क्षमता आता ७६.१० एमटीपीएवर पोहोचली आहे. गेल्या ६ महिन्यांत, एसीसी लिमिटेडचे शेअर्स ३३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स सहा महिन्यांत १७९६.७५ रुपयांवरून २४००.८० रुपयांपर्यंत वाढलेत.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)