नवी दिल्ली : केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या नीलाचल इस्पात निगमची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंपनी आता टाटा स्टील विकत घेणार असून, यासाठी १२,१०० कोटी रुपयांची बोली टाटाने लावली होती.
नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत ३ कंपन्या शर्यतीत होत्या. नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीसाठी ३ कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये टाटा स्टील, जेएसपीएल आणि जेएसडब्ल्यू स्टीलचा समावेश आहे.
नीलाचलला सध्या मोठ्या प्रमाणात तोटा होत असून, कंपनीचे उत्पादन ३० मार्च २०२० पासून बंद आहे. नीलाचल इस्पात निगममध्ये एमएमटीसी (एमएमटीसी) ची ४९ टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. सरकारने ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी आरएफपी जारी केला होता. याशिवाय एनआयएनएलमध्ये भेलचा ०.६८ टक्के हिस्सा आहे. एमएमटीसीला भाग विक्रीची रक्कम स्वतंत्रपणे मिळेल.