Sridhar Ramaswamy : आणखी एका विदेशी टेक कंपनीची कमान एका भारतीयाला मिळाली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध डेटा क्लाउड कंपनी स्नोफ्लेकची (Snowflake) धुरा आता भारतीय वंशाचे श्रीधर रामास्वामी यांच्या हाती असेल. कंपनीने श्रीधर रामास्वामी यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. यासह, रामास्वामी हे भारतीय वंशाच्या टेक लीडर्सच्या यादीत सहभागी झाले आहेत. जागतिक टेक लीडर्सच्या यादीत गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, आयबीएमचे अरविंद कृष्णा आणि ॲडोबचे शंतनू नारायण यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
रामास्वामी कोणाची जागा घेणार?
रामास्वामी स्नोफ्लेकमधील त्यांचे सीनिअर फ्रँक स्लूटमन यांची जागा घेतील. फ्रँक स्लूटमन यांनी चार वर्षांहून अधिक काळ कंपनीचे सीईओ म्हणून काम केलं. मात्र, फ्रँक हे कंपनीच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
आयआयटीमधून शिक्षण
रामास्वामी यांनी १९८९ आयआयटी मद्रासमधून कम्प्युचर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केलं. यानंतर त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केलं. डेटा क्लाऊड कंपनी स्नोफ्लेक सोबत ते २०२३ मध्ये जोडले गेले. स्नोफ्लेकनं लीडिंग प्रायव्हेट आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऑपरेटेड सर्च इंजिन नीवाचं अधिग्रहण केलंय. २०१९ मध्ये रामास्वामी यांनी आपले सहकारी विवेक रघुनाथन यांच्यासोबत नीवा ची स्थापना केली होती. याद्वारे त्यांनी गुगलला एक पर्याय तयार केला होता. सर्च इंजिननं नंतर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स स्टॅटजीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी गुगलमध्येही काही प्रमुख पदांवर काम केलंय.
याशिवाय त्यांनी बेल लॅब्स, ल्यूसेंट टेक्नॉलॉजी, बेल कम्युनिकेशन्स रिसर्चमध्ये रिसर्चर म्हणूनही काम केलंय. याशिवाय ग्रेलॉक पार्टनर्समध्ये व्हेन्चर पार्टनरच्या रुपातही काम केलंय. याशिवाय ते ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये ट्रस्टी बोर्डातही आहे.