देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी इंडिगोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. इंडिगो एअरलाइन्सची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडचे बाजार भांडवल २८ जून रोजी १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. कंपनीला मिळालेलं हे यश महत्त्वाचं आहे कारण हा आकडा पार करणारी इंडिगो ही देशातील पहिली विमान कंपनी आहे.
इंडिगोचा शेअर बुधवारी २६१९.८५ रुपयांवर बंद झाला. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ३.५५ टक्क्यांची वाढ दिसून आली. यासह कंपनीचे मार्केट कॅप १,०१,००७.५६ कोटी रुपये झालं आहे.
५०० विमानांची ऑर्डर
खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोनं एअरबससोबत मोठा करार केलाय. याअंतर्गत कंपनी ५०० Airbus A320 विमानांची खरेदी करणार आहे. एअरबसला कोणत्याही विमान कंपनीनं दिलेली ही सर्वात मोठी विमानांची ऑर्डर आहे. इंडिगो एअरलाइन्सनं या ऑर्डरबद्दल माहिती देताना २०३० ते २०३५ दरम्यान विमानांची डिलिव्हरी अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. ५०० विमानांची ही ऑर्डर केवळ इंडिगोची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर एअरबससह कोणत्याही विमान कंपनीनं केलेली एका वेळेची सर्वात मोठी खरेदीदेखील असल्याचं सांगण्यात आलं होतं.
इंडिगोचा ६१ टक्के वाटा
सध्याच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात इंडिगोचा वाटा ६१ टक्के आहे. इंडिगो सध्या २६ आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा पुरवत आहे. इंडिगोकडे ३०० हून अधिक विमानं आहेत. दररोज १८०० हून अधिक उड्डाणांद्वारे ही एअरलाइन देशातील ७८ शहरांना जोडते.