लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: संपूर्ण जगासमोरील आर्थिक आव्हाने कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. सुरुवातीला कोरोना महामारीमुळे जगभरातील देशांची अर्थव्यवस्था अतिशय वाईट म्हणावी इतक्या खालच्या स्तरावर पोहोचली होती. त्याच वेळी, जगभरातील अनेक देश सध्या महागाई वाढल्याने त्रस्त असून, यामुळे तब्बल सात कोटी लोक गरीब होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिला आहे. यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
२०२२ कठीण तर २०२३ महाकठीण
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिलिना जिर्योजिएवा यांनी एका ब्लॉगद्वारे महागाईच्या प्रभावाबाबत इशारा दिला आहे. क्रिस्टिलिना यांनी ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्ट केले की, २०२२ हे वर्ष कठीण तर २०२३ हे वर्ष आणखी कठीण असणार आहे. यासोबतच जनतेला महागाईतून लवकरच दिलासा मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे जगभरातील गरीब देशांतील ७ कोटी लोक गरीब होतील.
अनेक देशांमध्ये अस्थिरतेची भीती
क्रिस्टिलिना यांनी वाढत्या महागाईबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जगभरात महागाईचा दर सध्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे.
बहुतांश गरीब देशांना ५ टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत महागाईची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. यामुळे अनेक देशांत सामाजिक स्तरावर अस्थिरता निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
भारताचा विकास घटणार
- आशियाई विकास बँकेने वाढत्या महागाईच्या कारणामुळे भारताचा विकासदराचा अंदाज कमी झाला आहे.
- एडीबीने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताचा विकास दर कमी करत ७.२ टक्के केला आहे. यापूर्वी हा विकासदर ७.५ टक्के ठेवला होता. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सध्या जगभरात बड्या कंपन्यांनी भरती थांबविली आहे.
जागतिक ऊर्जा संकट ट्रिगर
युरोपमधील नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यातील व्यत्यय अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना मंदीच्या दिशेने ढकलू शकतो, ज्यामुळे जागतिक ऊर्जा संकट उद्भवू शकते. यामुळे २०२२ कठीण होईल आणि २०२३ मध्ये मंदीचा धोका वाढेल. त्याचबरोबर, प्रमुख मध्यवर्ती बँकांनी अधिक आर्थिक कठोरपणा अवलंबला असला तरीही महागाई वाढणार आहे. - क्रिस्टिलिना जिर्योजिएवा, प्रमुख, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
कशामुळे फटका
- पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती- खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती- रोजगार निर्मितीचे प्रमाण कमी- रशिया युक्रेन युद्ध- कोरोनाची नवी लाट