नवी दिल्ली : जो चांगल्यात चांगली किंमत देईल, अशा कोणालाही देशात कुठेही शेतमाल विकण्याची तसेच आधी ठरलेल्या किमतीने शेतमाल खरेदी करण्यास जो तयार असेल अशा खरेदीदारासाठी तो शेतमाल कंत्राटी पद्धतीने पिकवून देण्याची संपूर्ण मुभा देशातील तमाम शेतकऱ्यांना देणारे दोन अत्यंत महत्त्वाचे वटहुकूम केंद्र सरकारने जारी केले आहेत. हे दोन्ही वटहुकूम शुक्रवारपासून लागू झाले आहेत.
‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचा भाग म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे वटहुकूम जारी केले. शेतमाल कोणालाही विकण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याखेरीज अन्य प्रचलित कायद्यांनी घातलेले सर्व निर्बंध या वटहुकुमांनी हटविण्यात आले. या वटहुकुमांमध्ये ‘शेतकरी’ या शब्दाच्या व्याख्येत व्यक्तिगत शेतकºयाखेरीज शेतकºयांच्या सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक संस्थांचाही समावेश आहे. तसेच ‘शेतमाला‘मध्ये सर्व प्रकारची तृणधान्ये, भरड धान्ये, कडधान्ये, तेलबिया, खाद्यतेल, भाज्या, फळे, कठीण कवच्याची फळे, मसाल्याचे पदार्थ, ऊस तसेच कोंबड्या, डुकरे, शेळ्या-मेंढ्या व गायी-म्हशींपासून मिळणारी उत्पादने आणि मत्स्योद्योगाशी संबंधित उत्पादने या सर्वांचा समावेश असेल. मालाची खरेदी-विक्री पारंपरिक पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवहारांनीही करता येईल.
तंटे सोडविण्याची व्यवस्था
या दोन्ही वटहुकुमांच्या अंमलबजावणीतील तंटे सोडविण्याची स्वतंत्र आणि कालबद्ध व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यातील तरतुदींचा भंग केल्यास दंडआकारणीची सोय त्यात आहे.