चिन्मय काळेमुंबई : पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉरवर भारताकडून टीका होत असतानाच उलट भारतानेसुद्धा या कॉरिडॉरचा भाग व्हावे, असे आवाहन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अझीझ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ‘एआयआयबी’ च्या वार्षिक परिषदेसाठी ते आले होते. २००९ मध्ये राजकारण सोडल्यानंतर अझीझ हे सध्या आंतरराष्टÑीय वित्त संस्थाचे सल्लागार आहेत.ते म्हणाले, काश्मिर हा राजकीय विषय असला तरी जिथे उद्योग व व्यापाराच प्रश्न येतो, तेव्हा सर्व सीमा गळून पडतात. जगभरात सर्वच देशांनी एकमेकांशी सीमामुक्त होऊन आर्थिक व्यवहार करायला हवेत. पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉर हा त्याचाच एक भाग आहे. हा कॉरिडॉर व त्यानिमित्ताने उभा होणारा ‘वन बेल्ट वन रोड’ हा आशिया व पाश्चिमात्य देशांमधील व्यवहाराचा नाव मार्ग असेल. आशियातील सर्वच देशांचा युरोप व अमेरिकेशी होणारा व्यवहार यामुळे वाढणार आहे. मग भारताने त्यापासून दूर का राहावे. त्यांनीही या योजनेचा भाग व्हावे.‘एआयआयबी’ने पाकव्याप्त काश्मिरातील प्रकल्पांसाठीही निधी पुरवला आहे. त्यामध्ये या आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. एआयआयबीने त्यासाठी जवळपास ६८ हजार कोटींच्या मदतीची योजना आखली आहे. यावर अझीझ म्हणाले, एआयआयबी ही नवीन विचारांची बँक आहे. जागतिक बँक, मुद्रा निधी किंवा आशिया विकास बँक यासुद्धा अर्थसाहाय्य करतात. पण साह्य करताना यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष प्रकल्पात ढवळाढवळ करतात. एआयआयबी मात्र मदत देताना अशा अटी ठेवत नाही. भारत असो वा पाकिस्तान यासारख्या विकसनशील देशांसाठी ही चांगली बाब आहे.चीनच्या मदतीने पाकिस्तान उभारत असलेल्या ग्वादार बंदराला शह देण्यासाठी भारताने इराणमध्ये चाबाहार बंदराची निर्मिती सुरू केली आहे. पण शौकत अझीझ यांनी मात्र या बंदराचे स्वागत केले आहे. भारताने चाबाहार बंदर उभे केले तर त्यात वाईट काहीच नाही. चांगली बाब आहे. ही दोन बंदरे एकत्र आल्यास ते जागतिक व्यापाराचे केंद्र होईल. यामुळे भारताच्या या बंदारचे स्वागतच आहे, असे ते आवर्जून म्हणाले.
उद्योग-व्यापारात सीमा नको, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अझीझ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 5:08 AM