मुंबई - भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या किंगफिशरच्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण करारावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मात्र, विजय मल्ल्याने भारतात येण्यास नकार दिला असून आपण कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची प्रकिया सुरू केल्याचेही मल्ल्याने म्हटले आहे. त्यामुळे भारतात येण्यास मल्ल्याने असहमती दर्शवल्याचे दिसते.
विजय मल्ल्याने ट्विट करुन आपण अपील करणार असल्याचं म्हटलंय. त्यासाठी मल्ल्याकडे 14 दिवसांचा कालावधी आहे. कर्जबुडव्या विजय मल्ल्याची जवळपास 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. यास दुजोरा देत मल्ल्याने उलट्या बोंबा मारल्या होत्या. गेल्या महिन्यातच ब्रिटनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याचा निकाल भारताच्या बाजुने दिला होता.
3 फेब्रुवारीला ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावीद यांनी काळजीपूर्वक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतामध्ये मल्ल्याविरोधात पैशांची अफरातफर, फसवणूक असे गंभीर गुन्हे आहेत. याची दखल ब्रिटनने घेतली असल्याचे सचिव कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. त्यामुळे विजय मल्ल्याला लवकरच भारतात यावे लागणार आहे. मात्र, वरच्या कोर्टात अपील करण्याचा पर्याय मल्ल्याकडे आहे. मल्ल्याने अपील करण्याचा पर्याय निवडला असून भारतात येण्यास असहमती दर्शवली आहे. गृहसचिवांच्या निर्णयाचीच मी वाट पाहात होतो. त्यांच्या निर्णयाशिवाय अपील करण्याची प्रक्रिया करणे शक्य नव्हते. मात्र, आता वेस्टमिनिस्टार कोर्टाच्या निर्णयावर अपील करणे मला शक्य असून मी ती प्रक्रिया सुरू केल्याचेही मल्ल्याने म्हटलंय.
After the decision was handed down on December 10,2018 by the Westminster Magistrates Court, I stated my intention to appeal. I could not initiate the appeal process before a decision by the Home Secretary. Now I will initiate the appeal process.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 4, 2019